महायुतीत दोस्तीत-कुस्ती?; भाजप विधानपरिषदेची जागा लढणारच; बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेला शुभेच्छा
मनसेकडून कोकण पदवीधर मतदारसंघासाठी अभिजीत पानसे यांना अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे
मुंबई : लोकसभा निडणुकीत मनसेने भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मनसेच्या या उदारमतवादी धोरणाचे भाजपने ही स्वागत केले. त्यानंतर, महायुतीच्या (Mahayuti) प्रचारासाठी राज ठाकरे मैदानात उतरल्याचे दिसून आलं. भाजपा महायुतीच्या उमेदवारांसाठी त्यांनी जाहीर सभा घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत व्यासपीठही शेअर केले होते. राज ठाकरेंनी मुंबईतील महायुतीच्या सांगता सभेतून पंतप्रधान मोदींकडून काही अपेक्षाही व्यक्त केल्या होत्या आहेत. त्यामुळे, मनसे (MNS) हा महायुतीचा घटक असल्याचे बोलले जाते. मात्र, लोकसभा निवडणुकांच्या निकालापूर्वीच विधानपरिषद निवडणुकांवरुन महायुतीत खटके उडत असल्याचे दिसून येते. कारण, मनसेनं विधानपरिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता भाजपनेही (BJP) ती जागा आमची हक्काची असल्याचे म्हटले. तसेच, मनसेला निवडणुकीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.
मनसेकडून कोकण पदवीधर मतदारसंघासाठी अभिजीत पानसे यांना अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे राज ठाकरेंनी माझी उमेदवारी जाहीर केल्याचं पानसे यांनी पत्रकारांना बोलताना म्हटले. तर, हिंदुत्त्वासाठी लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकांत बिनशर्त पाठिंबा देऊन आमचा पक्ष चालणार आहे का? असा सवालही मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी उपस्थित करत भाजपने आम्हाला पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षा केली आहे. मात्र, मनसेच्या उमेदवारीनंतर आता भाजपनेही विधानपरिषद निवडणुकांसाठीची भूमिका स्पष्ट केली.
विधानपरिषद निवडणुकांसाठी कोकणातील पदवीधर मतदारसंघांची जागा ही आमची हक्काची आहे. निरंजन डावखरेंची ही जागा भाजपाची सिटींग जागा आहे. त्यामुळे, आम्ही विधानपरिषदेची निवडणूक लढणार आहोत. मनसेला आमच्या शुभेच्छा.. असे म्हणत भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली. दरम्यान, मनसेच्या उमेदवारीसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, आम्ही बैठकीतून काय तो निर्णय घेऊ असे म्हटले होते. मात्र, आज आशिष शेलार यांनी मनसेला शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिजीनत पानसे मनसेचे कि महायुतीचे?
दरम्यान, मनसेने अभिजीत पानसे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर विविध चर्चांना उधाण आले आहे. अभिजीत पानसे महायुतीचे उमेदवार आहेत की मनसेचे?, असे सवाल उपस्थित करण्यात येत आहे. याचदरम्यान अभिजीत पानसे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. अभिजीत पानसे आणि मनसेचे खेडमधील नेते वैभव खेडेकर यांनी वर्षा निवासस्थानी एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली?, मनसेच्या अभिजीत पानसे यांना एकनाथ शिंदे पाठिंबा देणार का?, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र, भाजपाने भूमिका जाहीर करत उमेदवार देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे, मनसेच्या महायुतीतील सहभागावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत.
ठाकरे पिता-पुत्रांवर टीका
उध्दव ठाकरे आमचे परंपरागत मित्र असताना त्यांनी हिंदूत्व सोडले, मित्र सोडले, याचा परिणाम ठाकरेंना भोगावे लागणार असल्याचं शेलार यांनी म्हटलं. तसेच, आदित्य ठाकरे यांनी रस्त्याबाबत केलेले आरोप तेच आहेत. चांगले काम करणाऱ्या ठेकेदारांबाबत आक्षेप आहेत. आदित्य ठाकरे यांना निकृष्ट दर्जाचे काम करणारे ठेकेदार पाहिजेत, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी केलेल्या आरोपावर प्रत्युत्तर दिलं.
भाजप मोठा भाऊ
भाजप मोठा भाऊ आहे, त्याप्रमाणे जास्त जागा भाजपा लढणार. पण, मित्र पक्षांचा सन्मान आम्ही ठेवणार असे म्हणत महायुतीतील विधानसभा जागावाटपावरही शेलार यांनी भाष्य केलं.
शिंदेंचा पक्ष निर्णय घेईल.
उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात गजानन कीर्तीकर यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त होत आहे. कीर्तीकर यांनी आपल्या मुलास फायदा होईल, अशा रितीने मतदारसंघात काम केल्याचं बोललं जात आहे. यासंदर्भात शेलार यांना प्रश्न विचारला असता, याबाबत कारवाईचा निर्णय एकनाथ शिंदे यांचा पक्ष ठरवेल, असे उत्तर शेलार यांनी दिले.
नालेसफाईचं काम आदित्य ठाकरेंच्या जवळच्या ठेकेदाराकडे
मुंबई नालेसफाईचे काम हे आदित्य ठाकरे यांच्या जवळच्या ठेकेदारांकडे आहे, त्यांचे काम योग्य नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: नाले सफाईबाबत पाहणी करीत आहेत, ते जागेवर जात आहेत. घरात बसून नाही, असा पलटवार शेलार यांनी आदित्य ठाकरेंच्या टीकेवर केलाय.