Lok Sabha Election : लोकसभा निवडणूक खर्चाची आकडेवारी समोर, भाजपकडून 1494 कोटींचा खर्च, काँग्रेसनं किती खर्च केले जाणून घ्या?
Lok Sabha Election: एडीआरच्या रिपोर्टनुसार आयोगाला आम आदमी पार्टीच्या खर्चाचं विवरण 168 दिवस उशिरानं मिळालं.

नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीनं 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 1494 कोटी रुपयांचा खर्च केला, जो एकूण खर्चाच्या 44.56 टक्के आहे. ही माहिती शुक्रवारी (20 जून 2025) निवडणूक सुधारणांसाठी काम करणाऱ्या असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सनंदिली आहे. एडीआरनं 32 राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांच्या खर्चाचं विश्लेषण केलं आहे.
एडीआरच्या रिपोर्टनुसार भाजपच्यानंतर खर्च करण्याच्या बाबत काँग्रेस 620 कोटींच्या खर्चासह दुसऱ्या क्रमांकावर आहे. जो पार्टीच्या एकूण खर्चाच्या 18.5 टक्के आहे. या पक्षांनी (16 मार्च ते 6 जून 2025) लोकसभा आणि आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिशा आणि सिक्कीम विधानसभा निवडणुकीत मिळून 3352.81 कोटी रुपये खर्च केले.
राष्ट्रीय पक्षांनी 6,930.246 कोटी जमवले
या खर्चात राष्ट्रीय पक्षांची भागीदारी 2,204 कोटी रुपये (65.75 टक्के) होती. रिपोर्टनुसार राष्ट्रीय पक्षांनी 6,930.246 कोटी रुपये (93.08 टक्के) जमवले. तर, प्रादेशिक पक्षांनी 515.32 कोटी (6.92 टक्के) उभारले. हे विश्लेषण अनिवार्य खर्चाच्या विवरणावर आधारीत आहे. या खर्चाची माहिती राजकीय पक्षांना लोकसभा निवडणुकीनंतर 90 दिवसांमध्ये आणि विधानसभा निवडणुकीनंतर 75 दिवसांमध्ये खर्च निवडणूक आयोगाकडे सादर करायचा असतो. एडीआरनं खर्चाची माहिती दाखल करण्यात उशीर झाला असल्याचं म्हटलं.
रिपोर्टनुसार निवडणूक आयोगाला आम आदमी पार्टीनं 168 दिवस उशिरानं माहिती दिली. भाजपनं 139 ते 154 दिवस उशिरानं खर्ज सादर केला. एडीआरनुसार काँग्रेसनं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी वेळेत रिपोर्ट दिला.
राजकीय पक्षांनी डिजीटल प्रचारावर किती खर्च केला?
एडीआरच्या रिपोर्टनुसार राजकीय पक्षांनी डिजीटल माध्यमाद्वारे खर्च करण्यासाठी 132 कोटी रुपये खर्च केला. तर, उमेदवारांनी त्यांच्यावरील गुन्ह्यांची माहिती प्रकाशित करण्यासाठी 28 कोटी रुपयांचा खर्च केला. तर, प्रवास खर्च 795 कोटी रुपयांचा झाला असल्याची माहिती आहे.
स्टार प्रचारकांच्या प्रवास खर्चामधील 795 कोटी रुपयांच्या खर्चापैकी 765 कोटी रुपये राजकीय पक्षांच्या हाय प्रोफाइल नेत्यांच्या प्रवास खर्चावर खर्च झाले. तर, इतर नेत्यांच्या प्रचार खर्चासाठी 30 कोटी खर्च झाले. एडीआरनं रिपोर्ट तयार केला तेव्हा निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाकप, झामुमो आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासह एकूण 21 राजकीय पक्षांचे खर्चाचे आकडे उपलब्ध नव्हते.
आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि ओडिशा या राज्यांमधील विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय जनता दल (राजद), लोक जनशक्ति पार्टी (रामविलास), ऑल झारखंड स्टूडेंट्स यूनियन (आजसू) पार्टी, केसी (एम) या राजकीय पक्षांच्या खर्चाची माहिती उपलब्ध झाली नाही. तर, पीपुल्स डेमोक्रेटिक पार्टी (पीडीपी) आणि केरळ कांग्रेस (एम) ने निवडणूक लढून देखील शून्य खर्च दाखवला.
एडीआरच्या रिपोर्टनुसार गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत 690 मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांनी सहभाग घेतला होता. एडीआरनं राजकीय पक्षांच्या खर्चावर देखरेख ठेवण्यासाठी निरीक्षक नियुक्त करण्याची मागणी केली.























