Mahayuti Seat Sharing : रवींद्र वायकरांच्या जोगेश्वरी पूर्वच्या जागेवर भाजपचा दावा, लोकसभेची आकडेवारी सांगत फडणवीसांकडे मागणी
Jogeshwari East : भाजप पदाधिकाऱ्यांनी खासदार रवींद्र वायकर यांनी तीनवेळा प्रतिनिधीत्व केलेल्या जोगेश्वरी पूर्व या जागेवर दावा केला आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर रवींद्र वायकर यांनी जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या आमदार पदाचा राजीनामा दिला होता. जोगेश्वरीतून ते शिवसेनेचे आमदार म्हणून विजयी झाले होते. भाजप कार्यकर्त्यांनी जोगेश्वरीच्या जागेवर दावा केला आहे. भाजपच्या माजी नगरसेविका उज्वला मोडक यांनी पदाधिकाऱ्यांसह देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत या जागेवर दावा केला. भाजपनं जोगेश्वरी पूर्वची जागा लढवल्यास या ठिकाणी महायुतीचा उमेदवार विजयी होईल, असं पत्र देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलं. शिवसेनेला जागा सोडल्यास या ठिकाणी महायुतीचा उमेदवार विजयी होणं अशक्य असल्याचा दावा देखील करण्यात आला आहे.
उज्वला मोडक या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. जोगेश्वरी पूर्व या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व खासदार रवींद्र वायकर यांनी यापूर्वी केलेलं आहे. रवींद्र वायकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेत प्रवेश केला होता. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रवींद्र वायकर खासदार झाले. त्यामुळं ही जागा रिक्त झाली होती.
भाजपचे स्थानिक जिल्हाध्यक्ष अनंत परब यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रात आम्हाला रवींद्र वायकर यांच्यासाठी प्रचार करायचा नव्हता. मात्र, नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेलं पाहायचं होतं म्हणून पक्षाचा आदेश मान्य करत रवींद्र वायकर यांचा प्रचार केल्याचं म्हटलं आहे.
रवींद्र वायकर हे जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून तीनवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. मात्र, ते या मतदारसंघातून 12 हजार मतांनी पिछाडीवर राहिले आहेत, असं भाजपच्या पत्रात म्हटलं गेलं आहे.
रवींद्र वायकर उद्ध ठाकरेंच्या शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आल्यानंतर एकही शिवसैनिक किंवा मतदार त्यांच्यासोबत आलेला नाही, असा दावा देखील करण्यात आला.
जोगेश्वरी पूर्वच्या जागेवर कोण लढणार?
महाविकास आघाडीच्या जागावाटपात ही जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर, आता जोगेश्वरी विधानसभेवर भाजप पदाधिकाऱ्यांकडून दावा करण्यात आला आहे. रवींद्र वायकर आता खासदार झाल्याने ही जागा रिक्त आहे. आता भाजपने या जागेवर दावा केला असून माजी नगरसेविका उज्वला मोडक इच्छुक आहेत. वायकर आणि मोडक जुने विरोधक आहेत तरीही लोकसभेत भाजपने वायकराना निवडून येण्यासाठी मदत केली आहे. माजी नगरसेविका उज्ज्वला मोडक यांनी कार्यकर्त्यासह नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.
इतर बातम्या :