(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gopaldas Agarwal : विधानसभा निवडणुकीपूर्वीच भाजपला मोठा धक्का! पूर्व विदर्भात माजी आमदार करणार काँग्रेसमध्ये घरवापसी, कारणंही सांगितलं
Gopaldas Agarwal : येत्या 13 सप्टेंबरला ते काँग्रेसमध्ये महाराष्ट्र प्रभारी रमेश चेनिथाल्ला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, यासह दिग्गज नेत्यांचे उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये पुनर्प्रवेश करणार आहेत.
गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात आज काँग्रेसकडून 2 वेळा विधानपरिषद तर 3 वेळा विधानसभा आमदार राहिलेले गोपालदास अग्रवाल यांनी भाजपाला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये जाण्याच्या निर्णय घेतला आहे. गेल्या अडीच वर्षांमध्ये महायुती सरकारने जिल्ह्यातील आणि गोंदिया शहरातील विकास कामे मार्गी न लागल्याने नाराज असलेले गोपालदास अग्रवाल (Gopaldas Agarwal) यांनी शेवटी भाजपाला रामराम ठोकला. तर येत्या 13 सप्टेंबरला ते काँग्रेसमध्ये महाराष्ट्र प्रभारी रमेश चेनिथाल्ला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, यासह दिग्गज नेत्यांचे उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये पुनर्प्रवेश करणार आहेत.
गोंदिया विधानसभा येथील माजी आमदार गोपालदास अग्रवाल (Gopaldas Agarwal) यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसमधून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता माजी आमदार गोपालदास अग्रवाल (Gopaldas Agarwal) हे पुन्हा काँग्रेसमध्ये घर वापसी करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून ते भाजपमध्ये अस्वस्थ होते. अखेर आज पत्रकार परिषद घेत त्यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती. मात्र, आता दिल्लीवरून त्यांच्या पक्ष प्रवेशाला ग्रीन सिग्नल मिळाल्याची माहिती आहे. गोपाल अग्रवाल हे काँग्रेसकडून 2 वेळा विधानपरिषद तर 3 वेळा विधानसभेचे सदस्य राहिलेले आहेत. मात्र 2019च्या निवडणुकीदरम्यान त्यांनी मोदी लाटेत भाजप प्रवेश केला होता. त्यांना भाजपने उमेदवारी ही दिली होती. मात्र, त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर ते भाजपात अस्वस्थ होते.
अखेर त्यांनी आज भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून काँग्रेसमध्ये घरवापसी करणार असल्याची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे दोन महिन्यापूर्वीच माजी आमदार रमेश कुथे यांनी भाजपमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. त्यानंतर पुन्हा एक माजी आमदार आणि भाजपला सोडचिट्टी दिल्याने पूर्व विदर्भात भाजपला मोठा धक्का समजला जात आहे. विशेष म्हणजे गोपाल अग्रवाल यांच्या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसचे आमदार सहसराम कोरोटे, काँग्रेस जिल्हा अध्यक्ष दिलीप बनसोड, काँग्रेस पदाधिकारी यांची उपस्थिती असल्याने ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार हे मात्र निश्चित झाले आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यामध्ये भाजपाला पुन्हा एक मोठा धक्का बसला आहे. ते महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेंनिथाल्ला यांच्या उपस्थितीत घरवापसी करणार आहेत. गेल्या अडीच वर्षात गोंदिया जिल्ह्यात महायुतीने विकास केला नसल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला आहे.