अजित पवार गटाच्या मावळ विधानसभेवर भाजपचा दावा; सुनील शेळके म्हणाले...
Sunil Shelke On Bala Bhegade: अजित पवार गटाच्या मावळ विधानसभेवरून महायुतीत चांगलाच तिढा निर्माण होऊ लागला आहे. भाजपनं दावा केल्यामुळे सुनील शेळकेंच्या अडचणी वाढल्या आहेत.
Maval Assembly Constituency: सध्या राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांचे (Maval Assembly Election 2024) वारे वाहू लागले आहेत. अजून निवडणुकांची घोषणा झालेली नाही, अशातच महायुतीतल सर्वच मित्रपक्षांनी जागावाटपाबाबत नवनवे दावे-प्रतिदावे करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी विधानसभेचं जागावाटप महायुतीसाठी तसं फारसं सोप नसेल, असंच दिसतंय. अशातच लोकसभेत चर्चेत राहिलेल्या मावळ मतदारसंघावरुन आता महायुतीत रस्सीखेच सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या अजित पवार गटाकडे असलेल्या मावळ विधानसभेवर (Maval Assembly Constituency) भाजपनं दावा सांगितला आहे. तसेच, त्याअनुषंगानं दोन ऑगस्टला (BJP) मेळाव्याचं आयोजन केलं आहे. आता यावरुन अजित पवार गटाचे (Ajit Pawar Group) आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी भाजपवर नाराजी व्यक्त केली आहे.
अजित पवार गटाच्या मावळ विधानसभेवरून महायुतीत चांगलाच तिढा निर्माण होऊ लागला आहे. भाजप इथं दावा करत असेल आणि हा दावा करताना राष्ट्रवादीच्या मावळ लोकसभेतील प्रचाराबाबत कोणी शंका घेत असेल, तर हे योग्य नाही, असं म्हणत अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी भाजपवर नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी मावळ विधानसभेचा पुढचा आमदार कमळाच्या चिन्हावर निवडून येईल, असा दावा केला आहे. यासंदर्भात बोलताना सुनील शेळके यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
ज्या पक्षाचा आमदार, त्याच पक्षाचा वाट्याला ती विधानसभा, असा बेसिक फॉर्म्युला महायुतीत ठरला आहे, असं असतानाही भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी मावळ विधानसभेचा पुढचा आमदार कमळाच्या चिन्हावर निवडून येईल, असा दावा करत 2 ऑगस्टला मावळात मेळाव्याचे आयोजन केलं आहे. मात्र, महायुतीचे प्रमुख मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री याबाबत निर्णय घेणार आहेत. मावळ लोकसभेत राष्ट्रवादीनं महायुतीचा धर्म पाळला, मात्र त्यावर शंका घेत भाजपनं धरलेला हा आग्रह योग्य नसल्याचं म्हणत, शेळकेंनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रत्येकाला महत्वाकांक्षा असल्यानं विधानसभा लढण्याची इच्छा व्यक्त करण्यात काहीच गैर नाही, त्या सर्वांना माझ्या शुभेच्छा आहेत. मात्र मी आगामी विधानसभा लढायला ठाम आहे का? हा निर्णय मी जनतेला विचारून घेईन. इतकंच काय तर 2 ऑगस्टच्या भाजपच्या मेळाव्याला ही मी जाऊ शकतो, असं म्हणत काहीसा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्नही यावेळी सुनील शेळकेंनी केला आहे.
काय म्हणाले होते बाळा भेगडे?
"मावळ तालुक्याचा इतिहास पाहिला तर 1957 ला मावळ विधानसभेतून रामभाऊ म्हाळगी यांनी जनसंघाच्या माध्यमातून मावळ तालुक्याचं प्रतिनिधित्व केलं आहे. 1957 ते 2024 या काळात सर्वाधिक वेळा जनसंघ, जनता पार्टी आणि भाजपचे आमदार जनतेनं निवडून दिले आहेत. संघटनेच्या ताकदीवर लोकप्रतिनिधी निवडून देणारा मतदारसंघ म्हणून मावळ तालुका ओळखला जातो. त्यामुळे परंपरागत भाजपचा बालेकिल्ला असलेला मावळ मतदारसंघ भाजपला मिळावा म्हणून आम्ही आमच्या नेत्यांकडे आग्रहाती मागणी करणार आहोत.", बाळा भेगडे म्हणाले आहेत.
संघर्ष हा विषय नाही, महायुतीचा निर्णय झाल्यानंतर आम्ही काय केलं? हे लोकसभेला सर्वांना पाहिलं आहे. आमच्यासाठी महायुती सर्वकाही आहे. मावळ भाजपचा बालेकिल्ला आहे. हे यापूर्वी अनेक निवडणुकांच्या माध्यमांमधून सिद्ध झालेलं आहे. पुन्हा एकदा मावळ मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या बळावर, जनतेच्या आशीर्वादावर ही जागा भाजपला मिळावी, असा आमचा प्रयत्न असेल, असंही बाळा भेगडे असं म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :