Birth Certificate for Bangladesh Citizens : मालेगावमध्ये बांगलादेशींना जन्म दाखले दिल्याचा ठपका, तहसीलदार नितीनकुमार देवरे शासकीय सेवेतून निलंबित
Birth Certificate for Bangladesh Citizens : मालेगावमध्ये बांगलादेशींना जन्म दाखले दिल्याचा ठपका ठेवत तहस
Birth Certificate for Bangladesh Citizens, Bangladesh Birth Certificate, Aadhar Card for Bangladesh : मालेगावमधील जन्म दाखले प्रमाणपत्र प्रकरण तहसिलदारांना भोवल्याचे समोर आले आहे. मालेगावमध्ये बांगलादेशींना जन्म दाखले दिल्याचा ठपका ठेवत मालेगावचे तत्कालीन तहसीलदार नितीनकुमार देवरे (Tahsildar Nitinkumar Deore) , नायब तहसीलदार संदीप धारणकर यांना निलंबित करण्यात आले आहे. तहसीलदार देवरे, नायब तहसीलदार धारणकर यांची विभागीय चौकशी होणार आहे. जन्म दाखले देतांना कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आालाय. माजी खासदार आणि भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. महसूल विभागाचे सह सचिव अजित देशमुख (Ajit Deshmukh) यांनी निलंबनाचे आदेश काढले आहेत. बांगलादेशी रोहिंग्यांना मालेगावात जन्म दाखले देण्यात आल्याची तक्रार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केली होती.
शासनाच्या आदेशात काय म्हटलं आहे?
ज्याअर्थी श्री. संदीप धारणकर, नायब तहसिलदार, मालेगांव, जि. नाशिक यांनी उक्त पदावर कार्यरत असताना कार्यालयीन कामकाज शासन निर्देशाप्रमाणे न करता आणि शासकीय कामकाजात पुरेशे गांर्भीय न दर्शविता जन्म प्रमाणपत्रे / दाखले निर्गमित केल्यामुळे त्यांनी कर्तव्यात कसूरी करुन महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम ३ चे उल्लंघन केले असल्याने श्री. संदीप धारणकर, नायब तहसिलदार, मालेगांव, जि. नाशिक यांच्याविरुध्द महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ मधील तरतुदीअन्वये विभागीय चौकशीची कारवाई करण्याच्या अधिनतेने श्री. संदीप धारणकर यांना निलंबित करणे आवश्यक आहे.
२. त्याअर्थी, महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ च्या नियम ४ (१) (अ) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन आता उक्त श्री. संदीप धारणकर, नायब तहसिलदार, मालेगांव, जि. नाशिक यांना तात्काळ प्रभावाने पुढील आदेश होईपर्यंत शासन सेवेतून निलंबित करण्यात येत आहे.
३. शासन असेही आदेश देत आहेत की, प्रस्तुत आदेश अंमलात असेपर्यंत श्री. संदीप धारणकर, नायब तहसिलदार, मालेगांव, जि. नाशिक यांचे निलंबन कालावधीतील मुख्यालय जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक येथे असेल व त्यांनी जिल्हाधिकारी, नाशिक यांच्या पूर्व संमत्तीशिवाय मुख्यालय सोडता कामा नये.
४. श्री. संदीप धारणकर, नायब तहसिलदार, मालेगांव, जि. नाशिक यांना त्यांच्या निलंबनाच्या कालावधीत निलंबन निर्वाह भत्ता देण्यासंबंधी खालील आदेश देण्यात येत आहेतः-
१) निलंबनाच्या कालावधीत श्री. संदीप धारणकर, नायब तहसिलदार, मालेगांव, जि. नाशिक यांनी खाजगी नोकरी स्वीकारू नये किंवा धंदा वा व्यापार करू नये. (त्यांनी तसे केल्यास ते दोषारोपास पात्र ठरतील व त्या अनुषंगाने त्यांच्याविरुध्द कारवाई करण्यात येईल) व तसे केल्यास ते निलंबन निर्वाह भत्ता गमाविण्यास पात्र ठरतील.
२) निलंबनाच्या कालावधीत त्यांना निलंबन भत्ता जेव्हा देण्यात येईल त्या प्रत्येक वेळी त्यांनी खाजगी नोकरी स्वीकारलेली नाही किंवा कोणताही खाजगी धंदा वा व्यापार करीत नाही अशा त-हेचे प्रमाणपत्र श्री. संदीप धारणकर, नायब तहसिलदार, मालेगांव, जि. नाशिक यांना द्यावे लागेल.
५. महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वोयेत्तर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने) नियम, १९८१ च्या नियम ६८ मधील तरतुदीनुसार श्री. संदीप धारणकर, नायब तहसिलदार, मालेगांव, जि. नाशिक यांना निलंबन निर्वाह भत्ता व इतर पूरक भत्ते देण्यात येतील.