Sanjay Raut Arrested: महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! अखेर संजय राऊतांना ईडीकडून अटक
Sanjay Raut Arrested: शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना अखेर ईडीकडून अटक करण्यात आली आहे.
Sanjay Raut Arrested: दिवसभराच्या चौकशीनंतर शिवसेना (Shiv Sena) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना अखेर ईडीकडून (ED) अटक करण्यात आली आहे. सायंकाळी 5.30 पासून त्यांची ईडी कार्यलयात चौकशी सुरू होती. यानंतर आता त्यांना पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संजय राऊत यांना 11 वाजून 38 मिनिटाला अटक करण्यात आल्याचं ईडी सूत्रांनी सांगितलं आहे. सध्या ईडी कार्यालयाबाहेर संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत उपस्थित आहे. काही वेळापूर्वी ईडी अधिकाऱ्यांनी त्यांना बोलून घेतलं होतं. ईडी कार्यालयातून बाहेर येताना ते काही कागदपत्रे आपल्यासोबत बाहेर घेऊन आले. जे राऊत यांना अटक करण्यात आल्याचं मेमो असल्याचं सांगण्यात येत आहे. तत्पूर्वी ईडीचे सहसंचालक सत्यव्रत कुमार मुंबई ईडी कार्यालयात पोहोचले होते. त्यांचे हस्ताक्षर झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
याबाबत माहिती देताना सुनील राऊत म्हणाले आहेत की, ''संजय राऊत यांना खोट्या प्रकरणात अडकवलं जात असून त्यांना अटक करण्यात आली आहे. उद्या सकाळी साडे नऊ वाजता त्यांना जे जे रुग्णालयार मेडिकलसाठी घेऊन जाणार आहेत. आज जी केस करण्यात आली आहे, यामधे पत्रा चाळीचा उल्लेख नाही. त्यामध्ये मागच्या ज्या काही 50 लाख रुपयांच्या ट्रांजेक्शन झाले होते, त्याचा उल्लेख आहे.'' ते म्हणाले, ''संजय राऊत यांची तब्येत व्यवस्थित आहे. आम्ही न्यायालयीन लढा लढणार आहोत. सत्याचा विजय होईल, असा आम्हाला विश्वास आहे.''
संजय राऊत यांच्याकडे काय आहे पर्याय?
संजय राऊत यांना ईडीने आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) अटक केली आहे. या कायद्याअंतर्गत ईसीआयआर (Supply of Enforcement Case Information Report) घेतले जाते. यानंतर अटक केली जाते. पीएमएलए कायद्याअंतर्गत अटक झाल्यानंतर सहसा जामीन मिळत नाही. म्हणून त्यांना काहीकाळ तुरुंगात राहावं लागू शकतं. राऊत यांच्याकडे आता न्यायालयीन लढा लढण्याचा पर्याय आहे. याच कायद्याअंतर्गत याआधी छगन भुजबळ यांनाही अटक करण्यात आली होती. तेव्हा त्यांना दोन वर्ष तुरंगात राहावं लागलं होतं. तसेच नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनाही याच कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे.