Bhandara News : बाळासाहेब थोरात यांची नाराजी दूर करणार का? नाना पटोले म्हणाले...
Bhandara News : बाळासाहेब थोरात यांची नाराजी दूर करणार का असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारण्यात आला. परंतु नाना पटोले यांनी थोरात यांच्याबाबतच्या प्रश्नाला बगल दिली.
Bhandara News : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या (Nashik Graduate Constituency Election) निवडणुकीत नाट्यमयरित्या घडामोडी घडल्या. यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी नाहक बदनामी होत असल्याचं कारण पुढे करत विधानसभा पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. यावरुन बाळासाहेब थोरात यांची नाराजी दूर करणार का असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना विचारण्यात आला. परंतु नाना पटोले यांनी थोरात यांच्याबाबतच्या प्रश्नाला बगल देत 15 फेब्रुवारीला काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली असून त्याचे निमंत्रण थोरात यांना दिल्याचं सांगितलं. मात्र, त्यांची मनधरणी किंवा त्यांना समजावण्याचा प्रयत्न करणार का याबाबत नाना पटोले यांनी स्पष्टोक्ती केली नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडाऱ्यात (Bhandara) माध्यमांशी बोलत होते.
भाजप खांद्यावर बंदूक ठेवून काम करते - नाना पटोले
विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपचा झालेला पराभव त्यांच्या जिव्हारी आला आहे. तांबे कुटुंबातील वाद हा कौटुंबिक असताना भाजपने त्याचं राजकारण केलं आहे. सत्तापिपासू असलेल्या भाजपला विधानपरिषद निवडणुकीच्या माध्यमातून जनतेने धडा शिकवल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. भाजप इतरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काम करते असाही आरोप नाना पटोले यांनी केला.
बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा
विधान परिषदेच्या निकालानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडून विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा सादर करण्यात आला. नाशिक पदवीधर निकालाच्या दिवशी नाराजी व्यक्त करतानाच राजीनामा दिल्याचं कळतं. काही दिवसांपूर्वी सत्यजीत तांबे यांच्या पत्रकार परिषदेतून महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबाबतची नाराजी उघडपणे जाहीर झालेली होती. अशातच आता बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्यानंतर ही नाराजी अगदी टोकाला पोहोचल्याचं म्हटलं जात आहे.
आमची सुरक्षा काढून खोकेवाल्या आमदारांना सुरक्षा देऊन जनतेच्या पैशाची उधळपट्टी : नाना पटोले
मी विधानसभेचा अध्यक्ष होतो. माझीही सुरक्षा या राज्य सरकारने काढली आहे. महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा या राज्य सरकारने काढून ज्यांना गरज नाही, अशांनाही सुरक्षा दिली आहे. खोकेवाल्या आमदारांनाही राज्य सरकारने सुरक्षा दिली असून या सुरक्षेच्या नावावर राज्य सरकार दररोज वीस लाखांचा तर महिन्याला दोन कोटींच्या वर पैशाची उधळपट्टी करत आहे. त्यामुळे महत्त्वाच्या व्यक्तींना सुरक्षा न देता, तिच्या पैशाची केवळ उधळपट्टी राज्य सरकार करत आहे. जनतेच्या या सर्व पैशांचा हिशोब विधानसभेत घेणार आहे, असं सांगत जे पदावर नाहीत अशांनाही सुरक्षा प्रदान करण्यात आल्याचा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला.
संबंधित बातमी