विधानसभेत ओबीसी बहुजन पार्टी 200हून अधिक जागा लढणार, टी. पी. मुंडेंनी केली घोषणा, म्हणाले, बीडमधील 6 सीटसाठी..
राज्यात विधानसभा निवडणुकीत दोनशेहून अधिक जागा ओबीसी बहुजन पार्टी लढणार असल्याचं टी. पी मुंडे यांनी स्पष्ट केलंय.
Beed: राज्यात विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मराठा-ओबीसी आरक्षणाचा (OBC reservation) प्रश्न तापल्याचे दिसून येत असताना नुकतेच प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या वक्तव्यानंतर आगामी येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओबीसी बहुजन पार्टी कामाला लागली आहे. ओबीसी बहुजन पार्टी 200हून अधिक जागा लढणार तर बीड जिल्ह्यातील सहाही विधानसभा जागा ताकतीने लढणार असल्याचं ओबीसींचे नेते टी. पी मुंडे म्हणाले आहेत.आज बीडमध्ये प्राध्यापक टी.पी मुंडे यांच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत टी.पी मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
दरम्यान, आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसींच्या आरक्षणाला 100टक्के धाेका असून एकाही कुणबी मराठा उमेदवाराला विधानसभेत मत न देण्याचे वक्तव्य केल्यानंतर आता ओबीसी नेत्यांकडून विधानसभेसाठी मोर्चेबांधणी होताना दिसत आहे.
200 हून अधिक जागा लढवणार
राज्यात विधानसभा निवडणुकीत दोनशेहून अधिक जागा ओबीसी बहुजन पार्टी लढणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. तर याच अनुषंगाने राज्यभरात बैठका सुरू असून प्रत्येक जिल्ह्यात बैठका सुरू आहेत. बीड जिल्ह्यातील सहाही विधानसभा लढणार आहोत. जरांगे पाटील किती जागा लढणार हा त्यांचा प्रश्न आहे. आमचा नाही आता ओबीसी समाज पूर्णतः जागा झालाय.
मराठा नेतेच जरांगेंना विरोध करताहेत
मराठा समाजालासुद्धा समजलं आहे की जरांगे काय आहेत. इतर पक्षातील मराठा नेते हे जरांगेना विरोध करत आहेत. त्यांच्यातच आपापसात लढाई होईल आणि आमचे ओबीसी उमेदवार निवडून येतील असा दावा टी.पी मुंडे यांनी केला आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्राखाली सरसकट आरक्षण देण्याची मागणी होत असताना दुसरीकडे ओबीसी नेते टी.पी मुंडे यांनी ओबीसी विधानसभेत जिंकून येणार असल्याचा दावा केलाय.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर ?
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी वाशिमच्या पोहरादेवी येथे खळबळ जनक वक्तव्य केलंय. या निवडणुकीत कुणबी मराठा उमेदवाराला मतदान करू नका असं त्यांनी ओबीसींना आवाहन केलं असून विधानसभेत ठरावाच्या वेळी कुणबी समाजाची पाटीलकी जागी झाली तर ते आपल्या बाजूने मतदान करणार नाहीत. त्यामुळे यापुढे ओबीसींनी कुणबी सोडून इतर ओबीसी उमेदवाराला मतदान केलं पाहिजे असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत.
हेही वाचा: