Pradnya Singh Thakur Statement : हिंदूंनी घरात शस्त्र ठेवावीत नाहीतर सुऱ्या धारदार ठेवा : प्रज्ञा सिंह ठाकूर
Pradnya Singh Thakur Controversial Statement : साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी हिंदू कार्यकर्त्याच्या हत्येकडे लक्ष वेधून हिंदूंना स्वसंरक्षणासाठी धारदार चाकू घरी ठेवण्यास सांगितलं.
Pradnya Singh Thakur Controversial Statement : भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर (Sadhvi Pradnya Singh Thakur) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. कर्नाटकातील हिंदू (Hindu) कार्यकर्त्यांच्या हत्येबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, "हिंदूंना त्यांच्यावर आणि त्यांच्या प्रतिष्ठेवर हल्ला करणाऱ्यांना प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आहे." हिंदू समाजाला किमान त्यांच्या घरात चाकू ठेवण्याचा सल्ला दिला आणि प्रत्येकाला स्वतःचे संरक्षण करण्याचा अधिकार असल्याचं प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी सांगितलं. लव्ह जिहादबाबत (Love Jihaad) त्या म्हणाल्या की, त्यांना (मुस्लिमांना) जिहादची परंपरा आहे. बाकी काही नाही तर ते लव्ह जिहाद करतात. प्रेम असलं तरी त्यातही ते जिहाद करतात. आपण (हिंदू) सुद्धा प्रेम करतो, आपण देवावर प्रेम करतो, संन्यासी आपल्या परमेश्वरावर प्रेम करतो.
प्रज्ञा ठाकूर यांनी 'हिंदू जागरण वेदिके'च्या वार्षिक कार्यक्रमात वक्तव्य केलं. त्या म्हणाल्या की, "संन्यासी म्हणतात की देवाने निर्माण केलेल्या या जगात सर्व अत्याचारी आणि पापींचा अंत करा, अन्यथा प्रेमाची खरी व्याख्या इथे टिकणार नाही. त्यामुळे लव्ह जिहादमध्ये गुंतलेल्यांना त्याच पद्धतीने उत्तर द्या. तुमच्या मुलींचे रक्षण करा, त्यांना योग्य संस्कार द्या." याशिवाय हिंदू कार्यकर्त्याच्या हत्येकडे लक्ष वेधून त्यांनी लोकांना स्वसंरक्षणासाठी धारदार चाकू घरी ठेवण्यास सांगितलं.
'शत्रूंचे शीर कापले जातील'
प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या की, 'लव्ह जिहाद करणाऱ्यांना लव्ह जिहादसारखे उत्तर द्या. तुमच्या मुलींना सुरक्षित ठेवा. मुलींना सुसंस्कृत ठेवा. घरी शस्त्र नसेल तर भाजी कापण्यासाठीचा चाकू धारदार ठेवा. त्याने आपल्या हर्षावर चाकूने वार केले होते. आपल्या हिंदू वीरांना, भाजपच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला. त्यामुळे आपणही भाजी कापण्यासाठीच्या सुऱ्या धारदार ठेवल्या पाहिजेत. कधी संधी येईल माहित नाही. आपली भाजी चांगली कापली की शत्रूंचं तोंड आणि शीरही चांगले कापले जातील.
हर्षच्या हत्येचा मुद्दा उपस्थित
प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी शिवमोग्गा इथल्या हर्षासह हिंदू कार्यकर्त्यांच्या हत्येच्या घटनांकडे लक्ष वेधून लोकांना स्वसंरक्षणासाठी धारदार चाकू घरात ठेवण्यास सांगितलं. त्या म्हणाल्या की, 'आपल्या घरात शस्त्रे ठेवा. बाकी काही नाही तर किमान चाकू धारदार ठेवा जे भाजी कापण्यासाठी वापरले जातात. तेव्हा काय परिस्थिती निर्माण होईल माहित नाही. प्रत्येकाला स्वसंरक्षणाचा अधिकार आहे. आपल्या घरात कोणी घुसून हल्ला केला तर त्याला चोख प्रत्युत्तर देणे हा आपला अधिकार आहे.
आपल्या मुलांना मिशनरी शाळांमध्ये शिकवू नका
भाजप प्रज्ञा ठाकूर यांनी पालकांना आपल्या मुलांना मिशनरी संस्थांमध्ये न पाठवण्याचा सल्ला दिला, "असे केल्याने तुम्ही फक्त तुमच्यासाठी वृद्धाश्रम उघडाल," असंही त्यांनी म्हटलं. "मिशनरी संस्थांमध्ये मुलांना शिकवून मुले तुमची आणि तुमच्या संस्कृतीची होणार नाहीत. ते वृद्धाश्रम संस्कृतीत वाढतील आणि स्वार्थी होतील," असं त्या पुढे म्हणाला. "तुमच्या घरी पूजा करा, तुमचा धर्म आणि धर्मग्रंथ वाचा आणि मुलांना त्याबद्दल सांगा, जेणेकरुन मुलांना आपली संस्कृती आणि मूल्ये कळतील," असं त्यांनी म्हटलं.