मोठी बातमी! काँग्रेसचे आणखी दोन आमदार भाजपाच्या गळाला; लवकरच राजीनामा देण्याची शक्यता
Congress : ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. आता काँग्रेसचे आणखी दोन आमदार भाजपच्या गळाला लागण्याची शक्यता आहे.
मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी सोमवारी काँग्रेसला (Congress) रामराम ठोकला. आज मंगळवारी (दि. 13) त्यांनी भाजपामध्ये (BJP) प्रवेश केला आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. आता काँग्रेसचे आणखी दोन आमदार भाजपच्या गळाला लागणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आणि आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांचा आज पक्ष प्रवेश झाला. यावेळी अशोक चव्हाण यांनी हा माझा व्यक्तिगत निर्णय होता मला कुणी जा असे सांगितले नाही. मी अधिक भाष्य करणार नाही, योग्य वेळी बोलीन, असे त्यांनी म्हटले.
काँग्रेसचे आणखी दोन आमदार भाजपच्या गळाला
अशोक चव्हाण यांच्या पाठोपाठ देगलूर विधानसभेचे आमदार जितेश अंतापूरकर (Jitesh Antapurkar) आणि नांदेड दक्षिण विधानसभेचे आमदार मोहनराव हंबर्डे (Mohanrao Hambarde) काँग्रेसचा हात सोडण्याची शक्यता असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. येत्या आठवड्यात हे दोन आमदार राजीनामा देण्याची शक्यता आहे.
आमदार राजू पारवेंचे सूचक वक्तव्य
वर्तमान राजकीय परिस्थितीमध्ये एकही आमदार अशोक चव्हाण यांच्यासोबत जाणार नाही. मात्र, आठ महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला काय राजकीय परिस्थिती राहील हे आज सांगू शकत नाही. उमरेड विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आमदार राजू पारवे (Raju Parve) यांनी हे सूचक वक्तव्य केले आहे. विशेष म्हणजे राजू पारवे अशोक चव्हाण यांच्यासोबत पक्ष सोडतील अशी शक्यता व्यक्त केली जात असताना पारवे यांनी हे सूचक वक्तव्य केले आहे. त्यामुळे अशोक चव्हाण आज जरी एकटेच भाजपमध्ये जाताना दिसत असले, तरी भविष्यात अनेक राजकीय उलथापालत होऊ शकतात असेच पारवे यांच्या वक्तव्यावरून दिसून येते.
माझा निर्णय पक्का, काँग्रेसमध्येच राहणार : आमदार विकास ठाकरे
काँग्रेस आमदार विकास ठाकरे (Vikas Thakre) यांनी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचा निर्धार एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केला आहे. प्रत्येक आमदार आपापल्या मतदारसंघातील स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊनच निर्णय करेल. मी काँग्रेसमध्येच राहील असा माझा निर्णय पक्का असल्याचे आमदार विकास ठाकरे म्हणाले. अशोक चव्हाण यांच्याशी दोन दिवसापूर्वीच संपर्क झाला होता. मात्र ते पक्ष सोडून जात आहेत, असा कुठलाही संकेत त्यांनी दिलेला नव्हता. पक्ष सोडल्यानंतरही अशोक चव्हाण यांनी माझ्याशी किंवा इतर कुठल्याही आमदाराशी संपर्क साधलेला नाही अशी माहिती ही विकास ठाकरे यांनी दिली. अशोक चव्हाण यांनी भविष्यात संपर्क साधला तरी मी काँग्रेस पक्ष सोडून जाणार नाही, असा दावाही ठाकरेंनी केला आहे. लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस पक्षात कुठलेही प्रयत्न केले जात नव्हते, प्रदेश काँग्रेस नेतृत्वाच्या कार्यपद्धतीबद्दल अशोक चव्हाण यांनी लोकमतच्या मुलाखतीत जो आरोप केला आहे, त्या संदर्भात मी भाष्य करू शकत नाही, मी तेवढ्या वरिष्ठ पातळीवर काम करणारा नेता नसल्याचे सांगून विकास ठाकरे यांनी तो प्रश्न टाळला.
आणखी वाचा