कोणतीही कारवाई राजकीय सुडापोटी केली जाणार नाही; आव्हाडांवरील कारवाईवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
Ekanath Shinde On jitendra awhad: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकीय वातारण तापले आहे.
Ekanath Shinde On jitendra awhad: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकीय वातारण तापले आहे. यावर सगळेच राजकीय पक्षच नेते आपली प्रतिक्रिया देत आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत की, ''जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा दिला की नाही हे मला माहित नाही. परंतु, या प्रकरणात पोलिस नियमानुसार चौकशी करतील. संबंधित महिलेच्या तक्रारीत तथ्य असेल तर पोलिस आपले काम करतील. आम्ही कोणत्याही सुडापोटी कारवाई करत नाही.''
काय आहे प्रकरण?
रविवारी कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या तिसऱ्या कळवा खाडी पुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी खासदार श्रीकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड आणि पीडित महिलेसह अन्य नेते उपस्थित होते. पीडित महिलेने दावा केला आहे की, उड्डाणपुलाच्या उद्घाटन प्रसंगी आव्हाड यांनी आपल्याला चुकीच्या पद्धतीने शरीराला स्पर्श करत बाजूला होण्यास सांगितले. त्यानंतर महिलेने स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांकडे संपर्क साधला. यावेळी त्यांनी महिलेला तक्रार दाखल करण्याचे सुचवले. याप्रकरणी आव्हाड यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 354 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. त्यात ते म्हणाले आहेत की, माझ्याविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवताना आयपीसी 354 कलम लावले. मला जे कलम लावलेले त्याच्याबद्दल वाईट वाटलं. माझ्या खूनाचे षडयंत्र रचल्याचा आरोप लावला असता तरी चालले असते. मात्र, विनयभंगाचा आरोप मान्य नाही. ते म्हणाले की, समाजामध्ये मान खाली जाईल, असा आरोप माझ्यावर लावण्यात आले. राजकारण करावे पण इतक्या खालच्या पातळीवर करू नये. याआधीदेखील पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलवण्यात आले आणि तिथे बेकायदेशीरपणे अटक करण्यात आली, असंही ते म्हणाले आहेत.
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी कार्यकर्ते आणि नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सुप्रिया सुळे म्हणाले आहेत की, एखादी महीला आरोप करते तेव्हा तिची पुर्ण बाजू ऐकून घेतली पाहिजे. मी स्वतः जितेंद्र आव्हाड यांच्याशी बोलले आहे. आव्हाड तिथं काय बोलतात ते पाहा. राजकारणाची पातळी खुप खालवली आहे. मुख्यमंत्री स्वतः तिथं होते अणि सगळे असताना देखील असे आरोप होणे चुकीचे आहे, असं त्या म्हणाल्या आहेत.