(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राज्यपाल भाजप कार्यकर्त्यासारखे काम करतात, आमदारांच्या नियुक्तीला आम्ही कोर्टात आव्हान देऊ; अनिल देशमुख यांचा इशारा
Anil Deshmukh: आमदारांच्या नियुक्तीच्या निर्णयावरुन माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी टीका करत राज्यपाल भाजप कार्यकर्त्यासारखे काम करत असल्याचे म्हटले आहे.
Maharashtra Politics नागपूर : राज्यपाल नामनिर्देशित 7 आमदारांच्या शपथविधीचा मार्ग मोकळा झाला आहे. राजभवनातील सोहळ्याला कोणतीही स्थगिती देण्यात आलेली नाही. निकाल प्रलंबित असताना 12 पैकी 7 आमदारांची नियुक्ती केल्याची हायकोर्टानं नोंद घेतली आहे. अंतिम निर्णय देताना आम्ही याबाबत आपलं मत देऊ, असं हायकोर्टानं म्हटलं आहे. तसेच, निकाल राखून ठेवताना नियुक्त्यांना कोणतीही स्थगिती नव्हती, तसेच आम्ही तसं कोणतंही आश्वासन दिलेलं नव्हतं, असं स्पष्टीकरण राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता डॉ. बीरेंद्र सराफ यानी दिलं आहे. दरम्यान याच मुद्द्याला घेऊन विरोधकांनी सरकारवर कडाडून टीका केली आहे. अशातच माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी टीका करत राज्यपाल भाजप कार्यकर्त्यासारखे काम करत असल्याचे म्हटले आहे.
आमदारांच्या नियुक्तीला आम्ही कोर्टात आव्हान देऊ : अनिल देशमुख
राज्यपाल नियुक्त आमदारांच्या मुद्यावर हायकोर्टात तातडीची सुनावणी घेण्यात आली. याचिकाकर्त्यांकडून याचिका कोर्टापुढे सादर करण्यात आली. निकाल राखून ठेवताना कोर्टाकडून कोणतेही निर्देश नव्हते, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी कोर्टात केला. त्यानंतर आम्ही कोणतंही आश्वासन कोर्टाला किंवा याचिकाकर्त्यांना दिलेलं नाही, असं महाधिवक्ता म्हणाले. दरम्यान यावरून अनिल देशमुख यांनी राज्यपालांवर टीका केली आहे. जेंव्हा आमचे सरकार होते तेंव्हा आमची यादी राज्यपालांना दिली होती. मात्र त्यावेळी त्याला मंजुरी दिली नव्हती आणि आता लगेच मंजुरी दिली, हे चुकीचे आहे. या विरोधात महाविकास आघाडी तर्फे याला कोर्टात आव्हान देण्यात येणार असल्याची माहिती ही अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी दिली.
मविआमध्ये 15 टक्के जागांचा निर्णय होणे बाकी
संपूर्ण राज्याला आतुरता लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election 2024) चे बिगुल आज वाजणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार असल्याचे बोलले जात आहे. भारत निवडणूक आयोगाकडून (Election Commission Of India Press Conference) महाराष्ट्र आणि झारखंड (Maharashtra Vidhansabha Election 2024) या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची आज घोषणा होणार आहे. यावर बोलतांना अनिल देशमुख म्हणाले की,केवळ राष्ट्रवादीसाठी नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही महत्वाची निवडणूक आहे. आम्ही निवडणुकीची वाट पाहत होतो. ऑक्टोबर मध्येच निवडणुका लागायला पाहिजे होती.दरम्यान, मविआ एकोप्याने निवडणूक लढणार आहे. तसेच आमची निवडणुकीची तयारी झाली आहे. आम्ही सर्वांना घेऊन निवडणूक लढवू. आम्हाला सर्वत्र प्रतिसाद मिळतोय. सरकार विरोधात शेतकरी नाराज आहेत, गृहिणी नाराज आहेत, समाजामध्ये नाराजी आहे. भाजपचे सरकार दोन वर्षे जनतेने पाहिले. जनता निवडणूक कधी लावतात याची वाट पाहत आहेत. मविआमध्ये 15 टक्के जागांचा निर्णय व्हायचा आहे, त्यावर लवकरच चर्चा करू. अशी माहितीही अनिल देशमुख यांनी दिली.
काटोलची जागा राष्ट्रवादीकडेच!
काटोलमध्ये काँग्रेसचे नाव सध्यातरी दिसले नाही. काटोलची जागा राष्ट्रवादी कडे आहे आणि ती आम्हालाच मिळणार. सलील देशमुख किंवा मी तेथे लढण्याबाबत आम्ही मिळून ठरवू. कोण कुठे लढणार? हे ठरवू, असेही ते म्हणाले. राज्याचे मुख्यमंत्री केवळ ठाणेकडेच पाहतात, हा टोल माफी केवळ निवडणुकी पुरतीच राहणार का? अशीही चर्चा आहे. निवडणूक झाल्यावर टोल वसुली सुरू होईल, अशीही चर्चा आहे. त्यामुळे यावर पुढील काळात सत्य कळून येणार असेही ते म्हणाले.
हे ही वाचा