Nilesh Lanke: शरद पवारांचे कानावर हात, पण निलेश लंकेंच्या पक्षप्रवेशाची सूत्रं सकाळीच फिरली? अमोल कोल्हेंसोबत गुप्त बैठक
Nilesh Lanke: निलेश लंके हे शरद पवार गटात जाणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. शरद पवार यांनी निलेश लंके यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा फेटाळून लावली असली तरी त्यांचे वक्तव्य हे संभ्रमात टाकणारे होते.
![Nilesh Lanke: शरद पवारांचे कानावर हात, पण निलेश लंकेंच्या पक्षप्रवेशाची सूत्रं सकाळीच फिरली? अमोल कोल्हेंसोबत गुप्त बैठक Amol Kolhe and Nilesh Lanke secret meeting in Pune Lanke may join Sharad Pawar camp soon Nilesh Lanke: शरद पवारांचे कानावर हात, पण निलेश लंकेंच्या पक्षप्रवेशाची सूत्रं सकाळीच फिरली? अमोल कोल्हेंसोबत गुप्त बैठक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/11/c32d2d4132529dcd8bf31ddf3773ff981710143694847954_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे: अजित पवार गटातील पारनेरचे आमदार निलेश लंके हे लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. सोमवारी सकाळपासून निलेश लंके हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात कोणत्याही क्षणी प्रवेश करतील, अशी चर्चा सुरु झाली होती. याविषयी बोलताना शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपल्याला काहीही माहिती नसल्याचे सांगत निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या पक्षप्रवेशाविषयी कानावर हात ठेवले होते. परंतु, त्याच्या काहीवेळानंतरच एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आमदार निलेश लंके यांनी सोमवारी सकाळी पुण्यातील शासकीय विश्रामगृहात शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांची भेट घेतली. याठिकाणी दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड काहीवेळ चर्चा झाली. या चर्चेचा नेमका तपशील अद्याप समजू शकलेला नाही. परंतु, या भेटीनंतर अमोल कोल्हे यांनी, 'निलेश लंके लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात येतील', असा विश्वास व्यक्त केला. त्यामुळे निलेश लंके यांच्या शरद पवार गटातील पक्षप्रवेशाविषयीचा सस्पेन्स आणखीनच वाढला आहे.
शरद पवार नेमकं काय म्हणाले?
निलेश लंके पुन्हा तुमच्या पक्षात प्रवेश करणार आहेत का, असा प्रश्न सोमवारी सकाळच्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांना विचारण्यात आला होता. परंतु, त्यावेळी शरद पवार यांनी आपल्याला काही माहिती नसल्याचे सांगितले. या सगळ्या चर्चेला काही अर्थ नाही. निलेश लंके यांना पुन्हा आमच्या पक्षात घेण्याची चर्चा एकदम कशी काय सुरु झाली? आमच्या पक्षात येण्यासाठी निलेश लंके यांच्यासारखे अनेक लोक इच्छूक आहेत. मग त्यांना विचारलं नसतं का? निलेश लंके यांचा आज आमच्याकडे पक्षप्रवेश आहे, हे मलाच माहिती नाही. मी तुमच्याकडूनच ही गोष्ट ऐकतोय, असे शरद पवार यांनी म्हटले होते.
लोकनेते, दक्षिण नगरमध्ये महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची 'तुतारी' वाजवा: अमोल कोल्हे
काही दिवसांपूर्वीच निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त अहमदनगरमध्ये डॉ. अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेले 'शिवपुत्र संभाजी' हे महानाट्य आयोजित करण्यात आले होते. या नाटकाच्या प्रयोगानंतर अमोल कोल्हे यांनी जाहीरपणे निलेश लंकेंना शरद पवार गटात येण्याची ऑफर दिली होती. लोकनेत्यांना वाढदिवसाला गिफ्ट द्यायचं असतं, पण मी मागतोय, लोकनेते यांनी लवकर निर्णय घ्यावा. महाराष्ट्र कधी दिल्लीच्या तख्तासमोर झुकत नाही. दिल्लीच्या तख्ताला घाम फोडणारा असा लोकनेता आमच्या सोबत खांद्याला खांदा लावून जर संसदेत आला तर सर्वसामान्यांचा आवाज दिल्लीत घुमेल. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी दक्षिण नगर मध्ये वाजली पाहिजे. लोकनेत्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले होते.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)