वंचितचे नेते राजेंद्र पातोडेंच्या मुलावर जीवघेणा हल्ला; अकोल्यात समर्थकांकडून घराची तोडफोड, कारही जाळली
वंचित समर्थकांकडून झालेल्या तोडफोडीच्या घटनेची माहिती मिळताच अकोल्यातील खदान आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

अकोला : वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव तथा प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांच्या मुलावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याने अकोला (Akola) जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती मिळताच वंचितच्या समर्थकांनी हल्ला करणाऱ्या तरुणाच्या घराची आणि वस्तूंची तोडफोड केल्याची घटनाही घडली आहे. पातोडे आणि त्यांच्या समर्थकांकडून ही तोडफोड करण्यात आली असून घराच्या अंगणात उभी असलेली ओमनी कार देखील आक्रमक झालेल्या समर्थकांकडून पेटवून देण्यात आली. या घटनेनं शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी (police) तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू केला आहे. तर, पातोड यांच्या मुलावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वंचित समर्थकांकडून झालेल्या तोडफोडीच्या घटनेची माहिती मिळताच अकोल्यातील खदान आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अकोला शहरातील आदर्श कॉलनीमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला होता. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या मुलावर आज शेजारीच राहणाऱ्या इंगोले कुटुंबातील एका सदस्याने हल्ला केला होता. त्यामध्ये पातोडे यांचा मुलगा गंभीर स्वरूपात जखमी झाला असून थोड्या वेळातच त्यांच्यावर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया पार होणार आहे. सध्या पातोडे यांच्या मुलावर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयाबाहेर मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते जमले आहेत. तर, पातोडे यांच्या मुलावर हल्ला झाल्याची माहिती मिळताच राजेंद्र पातोडे यांनी त्यांच्या समर्थकांना सोबत घेत इंगोले यांच्या घरावर हल्ला चढवला. त्यावेळी, समर्थकांनी शेजारच्या घरातील वस्तूंची तोडफोड करत मोठे नुकसान केले. तसेच, घराच्या अंगणात उभी असलेली कार देखील पेटवून दिल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, कार पेटवल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून या प्रकरणात खदान पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.
























