आहारावर बंदी योग्य नाही, अजित पवार स्पष्टच बोलले; आदित्य ठाकरे म्हणाले, 15 ऑगस्टला नॉनव्हेज खाणारच
15 ऑगस्ट दिनी मांसविक्री बंदी संदर्भातील प्रश्नावर अजित पवारांनी आपली भूमिका मांडली. ''मी टीव्हीवर बातमी पाहिली, श्रध्देचा प्रश्न असतो त्यावेळी अशा प्रकारे बंदी घातली जाते.

मुंबई : राज्यात मांसविक्री किंवा कत्तलखाने बंद ठेवण्याच्या निर्णयावरुन गदारोळ सुरू झाला आहे. 15 ऑगस्ट दिनी काही महापालिकांनी (Mahapalika) चिकन, मटणविक्री आणि कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यामध्ये, मालेगाव महापालिका, छत्रपती संभाजीनगर महापालिका आणि केडीएमसी आयुक्तांनीही असे आदेश जारी केल्याने विरोधकांकडून संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी देखील 15 ऑगस्ट दिनी मांसाहारावर बंदी घालणे योग्य नसल्याचे म्हटले. तर, शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केडीएमसी आयुक्तांच्या निलंबनाची मागणी करत, आम्ही नॉनव्हेज खाणारच असा पवित्रा घेतला आहे.
15 ऑगस्ट दिनी मांसविक्री बंदी संदर्भातील प्रश्नावर अजित पवारांनी आपली भूमिका मांडली. ''मी टीव्हीवर बातमी पाहिली, श्रध्देचा प्रश्न असतो त्यावेळी अशा प्रकारे बंदी घातली जाते. आषाढी एकादशी, महावीर जयंती अशावेळी निर्णय घेतला जातो. आपल्या राज्यात कोकणात आपण गेलो तर प्रत्येक भाजीत सुकट टाकतात. त्यामुळे अशी बंदी घालणे योग्य नाही. भावनिक मुद्दा असेल तर त्या काळासाठी बंदी घातली तर लोक समजू शकतात. परंतु, 15 ऑगस्ट दिनी महाराष्ट्रात बंदी घातली तर योग्य नाही, मी याबाबत माहिती घेतो'' असे म्हणत अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
15 ऑगस्ट रोजी आम्ही नॉनव्हेज खाणार
कल्याण डोंबिवलीच्या महापालिका आयुक्तांचे निलंबन केले पाहिजे, कारण व्हेज की नॉनव्हेज हा मुद्दा त्यांचा नाही. स्वातंत्र्यदिनी आम्ही काय खायचं हे आमचं स्वातंत्र्य आहे, आम्ही निश्चितच नॉन व्हेज खाणार, आमच्या घरी नॉनव्हेज खाल्लं जातंय, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी मांसविक्री बंदीच्या निर्णयावरुन सरकारवर आणि महापालिका आयुक्तांवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, आमच्या घरी नवरात्रीमध्ये माशांचा नैवेद्य असतो, आमची ती परंपरा आहे, असेही आदित्य ठाकरेंनी सांगितले.
महापालिकांचा आदेश काय?
धार्मिक सणांच्या पार्श्वभूमीवर मालेगाव महानगरपालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, मालेगाव शहरातील सर्व खाजगी कत्तलखाने, म्हैस मांस विक्रेते, बकरा मटन व कोंबडी मटन विक्रेते यांनी आपली दुकाने 15, 20 आणि 27 ऑगस्ट या दिवशी पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, छत्रपती संभाजीनगरमध्येही 15 ऑगस्ट रोजी शहरातील सर्व कत्तलखाने बंद राहणार आहेत. महानगरपालिकेच्या आदेशानुसार 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, श्रीकृष्ण जयंती 20 ऑगस्ट आणि जैन पर्युषण पर्व व 27 ऑगस्ट श्री गणेश चतुर्थी, जैन संवत्सरी असल्याने या तिन्ही दिवशी सर्व मांस दुकाने, कत्तलखाने आणि संबंधित व्यवसाय पूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश आहेत.
हेही वाचा
मालेगावात तीन दिवस मटण शॉप, कत्तलखाने बंद, संभाजीनगरमध्येही 15 ऑगस्टला कुलूप; महापालिकेचे आदेश

























