'आमचे पदर-बिदर सगळे फाटून गेलेत...'; अजित पवारांच्या विधानाने पिकला हशा, दादा म्हणाले सिरियसली बोलतोय!
NCP Ajit Pawar: बारामतीच्या जनतेच्या हितासाठी मी कायम प्रयत्नशील राहिलो आहे, असं अजित पवारांनी सांगितले.
Ajit Pawar: मुलींबाबत कोणी गैर करु नका. कोणी कितीही मोठ्या बाबाचा असला, तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. तारुण्याच्या भरात नको ते करायला जाल आणि अडचण येईल. नंतर म्हणाल दादा आमच्यावर पांघरुन घाला. पण माझ्याकडे पांघरून घालायला शिल्लक नाही. दादा मला पदरात घ्या...पदर-बिदर आमचे सगळे फाटून गेलेत, हसू नका मी सिरीयसली सांगतोय, असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार (NCP Ajit Pawar) यांनी केलं. कायदा फार कडक झालाय. आपल्या कुटुंबाकडे सगळ्यांनी लक्ष द्या. एक वय असतं, त्या वयात आपण प्रत्येकाने काय-काय केले ते आठवा...पण ते वय आता गेलं, आता चक्की पीसिंग अन् पीसिंग...नुसती चक्की पीसिंग नाही, आता फाशीच...असं अजित पवार म्हणाले. कायदा सुव्यवस्था फार महत्त्वाची जबाबदारी आहे. परवा जे टी. सी. कॉलेजमध्ये घडलं, हे माझ्याही मनाला पटलं नाही. यात तुमचही मला सहकार्य हवं आहे. पोलीस खात्याला ही सुचना दिल्या आहेत. कुणाची दादागिरी, गुंडगिरी मी बारामतीचे नेतृत्व करतोय तोपर्यंत चालू देणार नाही. जबाबदार नागरिक म्हणून काही आपली पण जबाबदारी आहे, असं अजित पवारांनी सांगितले.
'नवी पहाट नवी दिशा' या पद्धतीने आपल्याला जायचं आहे. तुम्ही सर्वांनी साथ दिली तर सर्वांग सुंदर बारामतीचे स्वप्न आपण पूर्ण करू शकू. काल राहुल गांधी म्हणाले कोल्हापूरमध्ये आमचं सरकार आल्यानंतर आम्ही जातीय जनगणना करणार. ते सरकार साडेचार वर्षांनी येणार आहे. त्यामुळे त्याला काही अर्थ नाही. सगळ्या गोष्टी केंद्राशी निगडित असतात. बाकीचे नुसतं गप्पा मारतात. आमचं सरकार आलं तर, आम्ही असं करू……काही करू शकत नाहीत, असंही अजित पवारांनी (NCP Ajit Pawar) सांगितले. मी शिव शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सोडली नाही. मी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री काम करताना कुठलाही वेगळा हेतू मनात ठेवून करत नाही. मराठी भाषेला अभिजात जातीचा दर्जा मिळाला हे आपण केंद्राकडून केलं. अनेक पंतप्रधान होते पण ते झालं नाही आता झालं, असं म्हणत अजित पवारांनी पंरतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं.
बारामतीची भारतात स्मार्ट सिटी म्हणून ओळख- अजित पवार
बारामतीनं मला गेल्या 33 वर्षांपासून साथ दिली आहे. बारामतीची भारतात स्मार्ट सिटी म्हणून ओळख आहे. मी कबूल करतो की, 1967 पासून शरद पवारांचे या प्रदेशासाठी मोठं योगदान आहे. मी सर्व काही केल्याचा दावा करत नाही. प्रदेशाला मार्गदर्शन करण्याचं नेतृत्व कौशल्य कोणाकडे आहे हे बारामतीतील जनतेला चांगलंच ठाऊक आहे. मंत्रिमंडळाच्या प्रत्येक बैठकीत कोणताही भेदभाव न करता बारामतीच्या जनतेच्या हितासाठी मी कायम प्रयत्नशील राहिलो आहे, असं अजित पवारांनी सांगितले.
बाराशे ते पंधराशे नोकऱ्या देणारे उद्योग बारामतीत आणणार- अजित पवार
बारामतीतून मिळणारा कर, महसूल हा पगार आणि वीज बिल भरण्यासाठी पुरेसा आहे. मी अनेक कामं मार्गी लावण्यासाठी मंत्रालयाकडून हजारो कोटी रुपयांची तरतूद करून ठेवत आलो आहे. बाहेरचे लोक बारामतीच्या विकासाचे कौतुक करतात, तरीही आमचे लोक आमच्या स्थानिक प्रयत्नांकडे दुर्लक्ष करून राष्ट्रीय समस्यांवर लक्ष केंद्रित करतात. मी दोन हजार कोटी गुंतवणुकीसह बाराशे ते पंधराशे नोकऱ्या देणारे उद्योग बारामतीत आणणार, हा माझा शब्द आहे. मी पत्रकार भवन आणि व्यापारी भवन देखील बांधणार आहे. बारामतीत आम्ही साडेआठ हजार कोटींची विकासकामं मार्गी लावली आहेत, अशी माहिती अजित पवारांनी दिली.
संबंधित बातमी:
तोच उमेदवार बारामतीतून घड्याळाच्या चिन्हावर उभा राहील; अजित पवार यांचं मोठं विधान