अरे, कुस्तीचा डाव माहितीय का बेटा? आयुष्यात कुस्ती खेळले नाही अन् कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष झाले; अजित पवारांची जहरी टीका
Baramati Lok Sabha Election 2024 : बारामतीकरांनो लक्षात ठेवा, हे पायाला भिंगरी बांधल्यासारखे गरा-गरा-गरा फिरतायत ना, हे 8 तारखेला कुठं निवांत जातायत बघा, असं वक्तव्य अजित पवारांनी केलं आहे.
बारामती : कुस्तीचा एक डाव माहित नाही आणि कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष झाले, अरे, कुस्तीचा डाव माहितीय का बेटा? असं म्हणत अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुतण्या युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांच्यावर अप्रत्यक्षपणे घणाघाती टीका केली आहे. बारामती मतदारसंघातील सुनेत्रा पवारांच्या (Sunetra Pawar) प्रचारसभेत अजित पवारांनी हे वक्तव्य केलं आहे. बारामतीकरांनो लक्षात ठेवा, हे पायाला भिंगरी बांधल्यासारखे गरा-गरा-गरा फिरतायत ना, हे 8 तारखेला कुठं निवांत जातायत बघा. परत दर आठवड्याला अजित पवार, तुम्ही आणि मी एवढंच आहे, असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.
अरे, कुस्तीचा डाव माहितीय का बेटा?
अजित पवारांनी बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष युगेंद्र पवार यांच्या अप्रत्यक्षपणे टीका करताना म्हटलं आहे की, काही-काही जण तर कधी आयुष्यात कुस्ती खेळले नाहीत आणि कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष झाले. अरे, कुस्तीचे डाव माहितीय का बेटा? घुटनाचीत कशाला म्हणतात? कुठल्या डावाला काय म्हणतात? चीतपट कशाला म्हणतात? उगीच आम्ही बोलत नाही, त्याच्यामुळे काहीजण वेगवेगळ्या पद्धतीने भाषणं करु लागले. तुम्ही फार वरती उड्या मारु नका, हे औट घटकेचं आहे.
काहीतरी पुड्या सोडायच्या आणि मताची पोळी भाजून घ्यायची
370 कलम रद्द केलं काय चुकलं. या देशातील नागरिकाला कोणत्याही राज्यात जमीन घेण्याचा अधिकार नाहीय का, तो अधिकार दिला. लोक म्हणत होती, दंगली होतील, काही झालं नाही. यांनीच यांचं दुकान चालवण्यासाठी काहीतरी पुड्या सोडायच्या आणि मताची पोळी भाजून घ्यायची. काहींचं हे अशा पद्धतीचं राजकारण आहे. खरं काय खोटं काय,समजून घ्या, भावनिक होऊ नका. त्यासाठी मतदान करताना मशीनवर पहिलं नाव सोडायचं दुसरं पकडायचं, सुनेत्रा अजित पवार नावाच्या पुढे घड्याळ आहे, त्याच्या पुढचं बटण दाबून लोकसभेवर पाठवायचं, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
सुप्रिया सुळेंवर अजित पवारांची टीका
काही लोक म्हणतात, महिला लोकसभेत गेल्यावर त्यांच्या नवरा काय पर्स घेऊन जाणारा मागं, मागं, मागं. आता अजित पवार काय पर्स घेईल का, तुम्हाला असं वाटतं? अरे काय? मग आता सदानंद सुळे पर्स घेऊन जातात का? मला तर एकेकाला अशी उत्तरं देता येतील, तुम्हाला पळता भुई थोडी होईल, तुम्ही थेट मुंबईच गाठाल, दुसरं कुठे थांबणार नाही. पण मी म्हणतो, जाऊ दे आपलेच आहेत, सगळे आपलेच भाई-बहिण आहेत, म्हणून मी शांत राहतो, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
पाहा व्हिडीओ : आयुष्यात कुस्ती खेळले नाही अन् कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष झाले, अजित पवारांची युगेंद्र पवारांवर टीका
महत्त्वाच्या इतर बातम्या :