Ajit Pawar On Chhagan Bhujbal: छगन भुजबळ देवेंद्र फडणवीसांना भेटले, मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले; अजित पवारांनी बोलणेच टाळले!
Ajit Pawar On Chhagan Bhujbal: अजित पवारांना भेटण्याआधी भुजबळांनी फडणवीसांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
Ajit Pawar On Chhagan Bhujbal: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. मुंबईतील सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळांमध्ये चर्चा झाली. महत्त्वाचं म्हणजे अजित पवारांना (Ajit Pawar) भेटण्याआधी भुजबळांनी फडणवीसांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळांच्या या भेटीवर अजित पवारांना माध्यमांशी विचारले. यावर हा आमच्या पार्टीचा अंतर्गत विषय आहे. तो आमचा आम्ही सोडवू, असे म्हणत अजित पवार यांनी छगन भुजबळांवर बोलणे टाळले. अजित पवारांनी पुण्यातील वाहतूक कोंडीवर भाष्य केले. वाहतूक कोंडीवर 15 दिवसांनी बैठक घेणार आहे. पुणेकरांना वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यावर सर्व विभागांची बैठक आयोजीत केली आहे. पुण्यातील केईम रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांनी जागा सोडायची तयारी दर्शवली आहे. त्यांना महापालिका दुसरीकडे जागा उपलब्ध करुन देईल, असं अजित पवारांनी सांगितले.
छगन भुजबळांच्या नाराजीवर देवेंद्र फडणवीस तोडगा काढणार-
छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये 40 मिनिटं चर्चा झाली. देवेंद्र फडणवीसांनी माझं सर्व ऐकून घेतलं. यामध्ये मला 8 ते 10 दिवसांचा वेळ द्या...आपण 8-10 दिवसांत शांततेने मार्ग काढू, असं आश्वासन देखील देवेंद्र फडणवीसांनी दिल्याची माहिती छगन भुजबळांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली. दरम्यान राज्यातील इतरही महत्त्वाच्या विषयांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा झाल्याचं छगन भुजबळांनी सांगितलं. महत्त्वाचं म्हणजे अजित पवारांना भेटण्याआधी भुजबळांनी फडणवीसांची भेट घेतली.. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
अजित पवार म्हणाले, नवीन लोकांना संधी द्यायला हवी, भुजबळ म्हणतात...
नवीन लोकांना संधी द्यायला हवी, असं विधान अजित पवारांनी केलं होतं. यावर देखील छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली. चांगली गोष्ट आहे, पण हे ठरवलं पाहिजे किती वर्ष तरुण म्हणायचे, की 67-68 पर्यंत तरुण म्हणायचं?, मी अगोदरच म्हणालो होतो, मला लोकसभेत पाठवा तिथं थांबावं लागलं, राज्यसभेत थांबावं लागलं, तेव्हा म्हणाले राज्यात गरज आहे. आता म्हणतात राज्यसभेत जा...म्हणजे मी विधासभेत राजीनामा द्यावा, हे कसं शक्य आहे?, असा सवाल छगन भुजबळांनी उपस्थित केला. तसेच अजित पवारांकडून तुमची फसवणूक झाली का?, या प्रश्नावर मला माहित नाही, तुम्हाला काय निष्कर्ष काय काढायचा तो काढा, असं छगन भुजबळांनी सांगितले.