Ajit Pawar : प्रत्येक योजनेत 2-4 टक्के भ्रष्टाचार होतो, माणिकराव कोकाटेंच्या वक्तव्यानं सेल्फ गोल, अजितदादांनी मंत्र्यांसाठी तातडीने आदेश काढला
Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी धोरणात्मक विषयांवर बोलू नये, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

मुंबई : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या एक रुपया पीक विमा योजनेतील गैरप्रकारसंदर्भात बोलताना केलेल्या वक्तव्यानं वादंग निर्माण झाला होता. कुठल्याही योजनेत 2-4 टक्के भ्रष्टाचार होत असतो म्हणून योजना बंद केली पाहिजे असं नाही, असं माणिकराव कोकाटे म्हणाले होते. यानंतर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. यानंतर झालेल्या पक्षाच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (NCP) राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सक्त सूचना दिल्या आहेत. मंत्र्यांनी कोणत्याही धोरणासंदर्भात बोलू नये, असे आदेश देण्यात आले आहेत, अश माहिती सूत्रांनी दिली आहे.
मंत्र्यांनी धोरणांवर बोलू नये
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत मंत्र्यांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. मंत्र्यांनी कोणत्याही प्रकारे पॉलिसीबाबत बोलू नये, असे आदेश दिले गेले आहेत. सरकारी योजना तसेच आगामी विविध धोरणां बाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच संबंधित विषयांवर बोलतील, असंही मंत्र्यांना सांगण्यात आलं आहे.
कोणत्याही प्रकारे वाद निर्माण होतील अशी वक्तव्ये करणं टाळा, असं मंत्र्यांना सांगण्यात आलं आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नुकत्याच वाद निर्माण करणाऱ्या वक्तव्यांनंतर अजित पवारांनी मंत्र्यांना सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
माणिकराव कोकाटे काय म्हणाले होते?
एक रुपयात पीक विमा योजनेसंदर्भात बोलताना माणिकराव कोकाटे म्हणाले होते की योजना बंद करण्याचा निर्णय नाही. काही गैर प्रकार झाले आहेत. 96 सीएससी केंद्रावर गोंधळ झाला आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी फौजदारी कारवाई करतील. साडे चार लाख अर्ज रद्द केले आहेत. बीड मधेच नाही अनेक जिल्ह्यात प्रकार झाला आहे. सीएससी केंद्रातील लोकांनी गोंधळ केला आहे. त्यांना एक अर्ज मागे 40 रुपये मिळतात. सुरेश धस केवळ राजकिय आरोप करत आहेत.
योजनेत सुधारणा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. कुठल्याही योजनेत 2- 4 टक्के भ्रष्टाचार होत असतो म्हणून योजना बंद केली पाहिजे असं नाही.
कुठल्याही योजनेत 2-4 टक्के भ्रष्टाचार होतो या वक्तव्यावरुन विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. प्रत्येक योजनेमध्ये चार टक्के भ्रष्टाचार होतो? म्हणजे या सरकारने ठरवलं आहे चार टक्के भ्रष्टाचार होणार? असं वक्तव्य माणिकराव कोकाटेंनी केलं याचं आश्चर्य वाटतं असं जितेंद्र आव्हाड म्हणाले होते.
माणिकराव कोकाटे काय म्हणाले होते? पाहा व्हिडीओ
इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
