Ajit Pawar: मोठी बातमी: मुस्लीम समाजाविषयी 'गरळ' ओकणाऱ्या भाजपच्या नेत्यांवर अजित पवार नाराज, थेट दिल्लीत तक्रार करणार
Ajit Pawar Camp: गेल्या काही दिवसांमध्ये अजित पवार गट आणि भाजपमधील कुरबुरी वाढल्या आहेत. नितेश राणे सातत्याने मुस्लीम समाजाविरोधात आक्रमक भाषा वापरत आहेत. याबाबत अजित पवार प्रचंड नाराज असल्याच समजते.
मुंबई: गेल्या काही दिवसांमध्ये भाजपच्या कट्टर हिंदुत्त्वाचा पुरस्कार करणाऱ्या नेत्यांकडून मुस्लीम समाजाविषयी करण्यात येत असलेल्या वक्तव्यांवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे प्रचंड नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. मुस्लीमविरोधी वक्तव्यं करणाऱ्या या नेत्यांच्या भूमिकेचा फटका आगामी विधानसभा निवडणुकीत बसू शकतो. याची दखल घेत अजित पवार आता या भाजप (BJP) नेत्यांविरोधात थेट दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नितेश राणे यांच्यासह भाजपचे काही नेते वारंवार मुस्लीम समाजाबाबत आक्षेपार्ह टिप्पणी करुन धार्मिक तेढ निर्माण करत आहेत. या नेत्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे हे दिल्लीतील भाजप पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचा जो मूळ मतदार आहे, त्यामध्ये अल्पसंख्याक समुदायाचा समावेश आहे. अजित पवार आपल्या भाषणांमधून वारंवार आपण अल्पसंख्याक समाजाच्या बाजूने आहोत, असा विश्वास देत असतात. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) सातत्याने मुस्लीम समाजाला अंगावर घेणारी वक्तव्यं आणि आव्हान देण्याची भाषा केली जात आहे. अजित पवार हे भाजपसोबत सत्तेत आहेत. त्यामुळे भाजप नेत्यांच्या मुस्लीम समाजाविषयीच्या वक्तव्यांबाबत अजित पवार यांची भूमिका काय, असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हे भाजप पक्षश्रेष्ठींशी चर्चा करुन ही बाब त्यांच्या कानावर घालणार आहेत. भाजप नेत्यांच्या वक्तव्यांकडे लक्ष द्यावे, असे अजितदादा गटाकडून सांगितले जाणार आहे. या माध्यमातून आपण अजूनही मुस्लीम मतदारांच्या पाठीशी आहोत, असा संदेश देण्याचा प्रयत्न अजितदादा गट करत असल्याचे बोलले जात आहे.
अजित पवारांचे फेसबुक पेज हॅक?
सध्या राज्यभरात अजित पवारांकडून जनसम्नान यात्रा काढली जात आहे. या सभांना होणारी महिलांची गर्दी आणि अजित पवार यांचे पिंक पॉलिटिक्स चर्चेचा विषय ठरत आहे. अजितदादा गटाच्या या रणनीतीला महिला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असताना एक धक्कादायक बाब समोर आली आहे. अजित पवार यांचे फेसबुक पेज हॅक झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कारण अजित पवार यांचे सोशल मिडिया हँडल्स आणि फेसबुक पेजवरुन काही अज्ञात लोकांना फॉलो करण्यात आले आहे. यासंबंधी आम्ही सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करणार असल्याची माहिती अजितदादा गटाचे प्रवक्ते सुरज पाटील यांनी दिली. अजित पवार यांची प्रतिमा मलीन करणाऱ्यांना तातडीने शोधून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
आणखी वाचा
विधानसभेच्या तोंडावर अजितदादांना मोठा धक्का, बडा OBC नेता शरद पवारांच्या गळाला