Maharashtra Elections 2024: विधानसभेच्या तोंडावर अजितदादांना मोठा धक्का, बडा OBC नेता शरद पवारांच्या गळाला
Maharashtra Elections 2024: ईश्वर बाळबुद्धे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत उद्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश होणार आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील माजी मंत्री अनिल देशमुख उपस्थित राहणार आहेत.
मुंबई: विधानसभेची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे ओबीसी सेलचे प्रदेश समन्वयक आणि प्रदेश सरचिटणीस ईश्वर बाळबुद्धे यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर आता पुन्हा एकदा शरद पवारांकडे परतण्याचा निर्णय घेतला आहे, ईश्वर बाळबुद्धे यांची घरवापसी होणार आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला काही दिवसांपूर्वीच राम-राम करणारे ओबीसी विभागाचे राज्य समन्वयक व प्रदेश सरचिटणीस ईश्वर बाळबुद्धे उद्या(शुक्रवारी) पुन्हा स्वगृही परतणार आहेत.
ईश्वर बाळबुद्धे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत उद्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश होणार आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील माजी मंत्री अनिल देशमुख उपस्थित राहणार आहेत. उद्या सकाळी 11 वाजता हा प्रवेश पार पडणार आहे. ईश्वर बाळबुद्धे यांनी अनेक वर्ष ओबीसी चळवळीत काम केले आहे. आगामी निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाला शरद पवार गटाचा धक्का बसला आहे. छगन भुजबळ यांचे समर्थक आणि ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुद्धे यांचा उद्या शरद पवार, जयंत पाटील यांच्या उपस्थितीत ११ वाजता पक्ष कार्यालयात पक्षप्रवेश पार पाडणार आहे. ओबीसींना न्याय मिळत नसल्याची भावना घेऊन ओबीसी पदाधिकारी पवारांच्या गटात परतणार असल्याची माहिती आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडलेली असताना ईश्वर बाळबुद्धे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष होते. ईश्वर बाळबुद्धे यांनी राज्यभरात यात्रा काढली होती. मागील विधानसभा निवडणुकीत ओबीसी आमदारांचा राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचा मोठा वाटा होता. ईश्वर बाळबुद्धे प्रत्येक मतदारसंघात जाऊन त्यांनी प्रचार केला होता. ओबीसी सेलच्या कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबिर नागपूर येथे ईश्वर बाळबुधे यांच्या नेतृत्वात घेण्यात आलं होतं. महाविकास आघाडीचे सरकार असताना ओबीसी महामंडळाच्या अध्यक्षपदी बाळबुद्धे यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. मात्र नियुक्तीचा आदेश सरकार अस्तित्वात असेपर्यंत निघालेला नव्हता. नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडली. तेव्हा ईश्वर बाळबुधे यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता वर्षभराच्या आत त्यांनी पुन्हा घरवापसी केली आहे.
ओबीसी समाजासाठी (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांनी पुढाकार घेतला नाही. ओबीसी महामंडळावर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली नाही. एखाद्या खासगी कंपनीप्रमाणे पक्षाचा कारभार सुरू असल्याचा आरोप करून बाळबुद्धे यांनी शरद पवार यांची भेट घेऊन परत जाण्याचा निर्णय घेतला आहे. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची भेट घेऊन बाळबुद्धे यांनी आपला निर्णय कळवला आहे.