अजित पवार आलेच, 'दादा'स्टाईल फटकेबाजीही केली; शिवाजी पार्कवर आठवलेंची कविताही गाजली
शिवाजी पार्क हे ऐतिहासिक मैदान असून याच मैदानाच्या साक्षीने विकासाचं नवं पर्व मोदींच्या नेतृत्वात सुरू होत आहे. गेल्या 10 वर्षातील मोदींचं काम गौरवास्पद आहे, त्यांच कणखर नेतृत्वच भारत देशाला पुढे घेऊन जाणार आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यात आज मुंबईत दिग्गज नेत्यांच्या सभांची पर्वणी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आजच्या सभेच्या निमित्ताने एकत्र येत आहेत. मुंबईतील शिवाजी पार्कवर ही ऐतिहासिक सभा होत असल्याने मुंबईसह (Mumbai) महाराष्ट्राला या सभेची उत्सुकता लागून राहिली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीचीही सभा होत असून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत बीकेसीत ही सभा होत आहे. शरद पवार, उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीचे नेते या सभेला संबोधित करणार आहेत. आजच्या या सभेतून अजित पवारांनी उपस्थित सभेला संबोधित केले.
शिवाजी पार्क हे ऐतिहासिक मैदान असून याच मैदानाच्या साक्षीने विकासाचं नवं पर्व मोदींच्या नेतृत्वात सुरू होत आहे. गेल्या 10 वर्षातील मोदींचं काम गौरवास्पद आहे, त्यांच कणखर नेतृत्वच भारत देशाला पुढे घेऊन जाणार आहे. त्यामुळेच, तिसऱ्यांदा मोदींना पंतप्रधान करण्याचा निर्धार आपण सर्वांनी करायचा आहे, असे अजित पवार यांनी म्हटले. तसेच, विरोधक विकासाच्या मुद्द्याला फाटा देऊन नको त्या विषयावर भाषणं करत असल्याचे म्हणत महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला.
आपल्या महाराष्ट्राला सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणून ओळखलं जातं. ज्या पद्धतीने हिंदवी स्वराज्याची स्थापन करताना शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन राज्य स्थापन केलं. त्याच प्रमाणे मोदींजींच्या नेतृ्त्वात आपण काम करत आहोत. पण, एखाद्या समाजात संभ्रमावस्था निर्माण करण्याचं काम केलं जात आहे. सध्या देशात संविधान बदलण्याची भाषणं सर्वजण करत आहेत, पण संविधान दिन साजरा करण्याचं काम मोदीजींच्या नेतृत्वात होत असल्याचे सांगत अजित पवार यांनी आपल्या भाषणातून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला. दरम्यान, अजित पवार यांनी शिवाजी पार्क येथील सभेला हजेरी लावली. त्यामुळे, गेल्या 2 दिवसांपासून अजित पवार यांच्या गायब झाल्याची चर्चा रंगली होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रमुख उपस्थितीतील शिवाजी पार्क येथील सभेत अजित पवार व्यासपीठावर दिसले, मतदारांना आवाहन करत त्यांनी थोडक्यात आपलं भाषणही केले.
रामदास आठवलेंची अफलातून कविता
उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे
कारण,आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे
काँग्रेस-राष्ट्रवादीचा आयुष्यभर विरोध करत आले बाळासाहेब ठाकरे
मग, तुम्ही त्यांच्याकडे का गेलात उद्धव ठाकरे....
असे म्हणत रामदास आठवलेंनी कवितेतून आपल्या भाषणाची सुरुवात केली.
उद्धवजी तुम्हाला जे बोलायचं असेल ते बोला
पण 4 तारखेला आम्हीच देणार आहोत जबरदस्त टोला..
असेही रामदास आठवलेंनी म्हटले.