'महायुतीतील सर्वांशी जुळवून घ्या', अजित पवार देणार सल्ला; बोलावली महत्त्वाची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महामंडळ न मिळाल्यामुळे नाराजी आहे. त्यामुळे आजची बैठक विधानसभा निवडणूक आणि पक्षांतर्गत नाराजी या अनुषंगाने महत्त्वाची आहे.
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) आज सर्व आमदारांची देवगिरी निवासस्थानी बैठक बोलावली आहे. संध्याकाळी सात वाजता ही बैठक होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे. आजच्या बैठकीत महायुतीमध्ये (Mahayuti) काम करताना सर्वांशी जुळवून घ्या, अशा सूचना अजित पवार देणार असल्याची माहिती मिळत आहेत.
काही दिवसांपूर्वी अमित शाह यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीसोबत जुळवून घ्या अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आज अजित पवार आपल्या सर्व आमदारांना एकत्रित करून महायुतीमध्ये काम करण्याबाबत तसेच घटक पक्षातील इतर पदाधिकाऱ्यांसोबत जुळवून घेण्याबाबत सूचना देणार आहेत. यावेळी महामंडळ वाटप याबाबत देखील चर्चा होईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महामंडळ न मिळाल्यामुळे नाराजी आहे. त्यामुळे आजची बैठक विधानसभा निवडणूक आणि पक्षांतर्गत नाराजी या अनुषंगाने महत्त्वाची आहे.
भाजप नेत्यांना अमित शाह यांनी कोणत्या सूचना दिल्या?
केंद्रीय गृहमंत्री यांनी महायुतीच्या नेत्यांसोबत काल झालेल्या बैठकीत महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर येऊ नये, जाहीर वाद टाळावेत अशा सूचना केल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांकडून झालेल्या चुका यावेळी करुन नयेत अशा सूचना देखील अमित शाह यांनी दिल्याची माहिती आहे. महायुतीच्या नेत्यांनी संयम ठेवावा आणि एकजूट असल्याचे चित्र जनतेसमोर जाईल, याची काळजी घ्यावी, असं देखील अमित शाह यांनी सांगितलं असल्याची माहिती आहे.
महायुतीनं आगामी विधानसभा निवडणुकीत जिंकून येण्याची क्षमता असलेले योग्य उमेदवार निश्चित करावेत अशा सूचना देखील अमित शाह यांनी दिल्या आहेत. विरोधकांच्या फेक नरेटिव्हला उत्तर द्या, असं देखील अमित शाह यांनी सांगितल्याची माहिती आहे.
राष्ट्रवादीच्या नेत्यांना डावललं जातंय का?
सध्या सत्तेत केवळ एकाच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना महामंडळ तसेच मंत्रिपदाचे वाटप होत असल्यामुळे आमदारांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय. महामंडळ वाटपात फक्त शिवसेनेच्या आमदारांना संधी देण्यात आली आहे. भाजप आणि राष्ट्रवादीच्या एकाही नेत्याचं नाव नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांना डावललं जातंय का? या चर्चांना उधाण आले आहे. या संदर्भात देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा :
Amruta Fadnavis: अमृता फडणवीसांच्या कामाने मंगलप्रभात लोढा इम्प्रेस, म्हणाले, मी त्यांना आजपासून मॅम नव्हे तर 'माँ अमृता' अशी हाक मारणार