Amruta Fadnavis: अमृता फडणवीसांच्या कामाने मंगलप्रभात लोढा इम्प्रेस, म्हणाले, मी त्यांना आजपासून मॅम नव्हे तर 'माँ अमृता' अशी हाक मारणार
Mumbai News: मुंबईत 22 तास उलटूनही अद्याप विसर्जन सोहळा संपलेला नाही. मुंबईतील गिरगाव चौपाटीवर अजूनही अनेक गणेश मंडळाचे गणपती विसर्जनाच्या रांगेत उभे आहेत. अमृता फडणवीस यांच्याकडून वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता.
मुंबई: एकीकडे मुंबईत गणपती विसर्जनाची धामधुम सुरु असताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या बुधवारी सकाळी समुद्रकिनारा साफ करण्यासाठी वर्सोवा येथे पोहोचल्या. गणेश विसर्जनानंतर दरवर्षी अमृता फडणवीस यांच्या दिव्याज फाउंडेशनच्यावतीने समुद्र किनारे स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली जाते. सकाळी 6.30 वाजता वर्सोवा किनारपट्टी स्वच्छ करण्याच्या मोहीमेला सुरुवात झाली. यावेळी अमृता फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगल प्रभात लोढा आणि मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर उपस्थित होते.
यावेळी राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अमृता फडणवीस यांच्या कामाचे तोंडभरुन कौतुक केले. त्यांनी म्हटले की, मी अमृता फडणवीस यांना विनंती करतो की, तुम्ही चौपाटीवरील कचरा साफ करतात हे चांगली गोष्ट आहे. मात्र, राज्यातील राजकारणात जो कचरा आलेला आहे तो साफ करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा. अमृता फडणवीस यांनी आईचे रूप घेतलेले आहे. मुला मुलींसाठी त्या जे काम करत आहेत त्यामुळं मी आजपासून त्यांना मॅम अमृता नाही तर माँ अमृता फडणवीस म्हणेन, असे मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले.
कॉर्पोरेट असो किंवा पॉलिटिक्स असो सर्वत्र स्वच्छता असली पाहिजे: अमृता फडणवीस
आपल्याकडे नद्या, तलाव, समुद्र हे असलेले पाण्याचे स्रोत स्वच्छ ठेवले पाहिजेत. आपण त्यांची काळजी घेऊ तेव्हाच हे स्वच्छ राहतील. समुद्र आणि तलावात प्लॅस्टिक टाकून मोठे प्रॉब्लेम होतात. शहराचा आर्थिक विकास करायचा असेल तर आधी स्वच्छता राखली पाहिजे. आपण जसं आपलं घर सुंदर ठेवतो, तसाच आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. आपण देवभक्त आहोत, देवाला स्वच्छता आणि सुंदरता आवडते. राजकारण असो किंवा आपली मनं असो, कोणतेही सेक्टर असो कोणत्याही सेक्टरमध्ये काही ना काही घाण असते. त्यामुळे स्वच्छता करण्याची गरज आहे, म्हणून आपण म्हणतो योगा करा मेडिटेशन करा. प्रत्येक एरियामध्ये तुम्हाला स्वच्छता पाहिजे कॉर्पोरेट असो किंवा पॉलिटिक्स असो सर्वत्र स्वच्छता असली पाहिजे, असेही अमृता फडणवीस यांनी म्हटले.
फडणवीसांच्या सागर बंगल्यावरील गणपतीचे विसर्जन
देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरही 10 दिवसांचा गणपती होता. या गणपतीच्या दर्शनाला भाजपचे नेते, आमदार आणि खासदार येऊन गेले. याशिवाय, केंद्रीय मंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हेदेखील फडणवीसांच्या घरी गणपतीच्या दर्शनाला आले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या गणपतीचे मंगळवारी दुपारी विसर्जन करण्यात आले. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले होते की, गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता आहे. त्याने सर्वांची विघ्न दूर करावीत. तसेच गणपती हा बुद्धीची देवता आहे. त्यामुळे गणपती बाप्पााने आम्हालाही सुबुद्धी द्यावी आणि ज्यांना सर्वात जास्त बुद्धीची गरज आहे त्यांनाही द्यावी, अशी टिप्पणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.
आणखी वाचा