Ajit Pawar : रक्ताच्या नात्यातील कुटुंबीयांनी घेरलं, बाहेरच्यांनीही विरोधाचं कुंपन उभं केलं; अजित पवार चक्रव्यूहात सापडलेत का?
Baramati Lok Sabha Election : अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याची भूमिका पवार कुटुंबीयांना पटली नसून आता त्यांचे लहान बंधू श्रीनिवास पवारही त्यांच्या विरोधात गेले आहेत.
पुणे : शरद पवारांचा (Sharad Pawar) हात सोडून, भाजपच्या मदतीने सत्तेचा सोपान चढलेले अजित पवार (Ajit Pawar) आता मोठ्या चक्रव्यूहाक अडकल्याचं बोललं जातंय. बारामतीतून सुनेत्रा पवारांना (Sunetra Pawar) उमेदवारीचं निश्चित केल्यानंतर, पवार कुटुंबातील अनेक सदस्य अजित पवारांविरोधात उभे ठाकलेत. इतकंच नाही तर कधी काळी अजित पवारांकडून दुखावलेले गेलेल्या नेत्यांनीही अजितदादांविरोधात भूमिका घेतलीय. त्यामुळे ही निवडणूक अजितदादांसाठी म्हणावी इतकी सोपी नसल्याचं बोललं जातंय.
सख्ख्या भावाने अजितदादांना फटकारलं
जमीन नावावर केली म्हणून घराबाहेर काढायचं नसतं, औषधांसारखी नात्यांनाही एक्स्पायरी डेट असते अशा शब्दात शरद पवार यांचे पुतणे आणि अजित पवार यांचे धाकटे भाऊ श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांना फटकारलं आहे.
धाकटे असूनही श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांचे जाहीर कान टोचलेत आणि त्याला कारण ठरलंय ते भाजपसोबत जाण्याचा अजित पवारांनी घेतलेला निर्णय. तोच धागा पकडत श्रीनिवास पवारांनी अजितदादांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय. त्यासाठी त्यांनी समाजकारण, राजकारण, नैतिकता आणि नातेसंबंधांवर बोट ठेवलंय.
कुटुंबीयांकडून आगपाखड
खरंतर कुटुंबातील सगळे आपल्याला एकटे पाडणार, अशी भीती अजित पवारांनी आधीच व्यक्त केली होती आणि झालंही तसंच. पण श्रीनिवास पवार अजित पवारांविरोधात बोलणारे पहिले पवार नाहीत. तर अजितदादांनी शरद पवारांची साथ सोडल्याचं पवार कुटुंबातील बहुतेकांच्या जिव्हारी लागलंय. खुद्द शरद पवार यांच्यासह सुप्रिया सुळे, रोहित पवार, युगेंद्र पवार आणि शर्मिला पवार यांनीही दादांवर आगपाखड केलीय.
राजकीय विरोधकांनी संधी साधली
हे तर झाले घरातले, पण बाहेरच्यांनीही अजित पवारांविरोधात कडव्या विरोधाचा पिंगा घातलाय. त्यामुळे आतले आणि बाहेरचे अशा विचित्र चक्रव्यूहात आता अजित पवार अडकल्याचं दिसून येतंय.
एकूणच सडेतोड, परखड, स्पष्ट बोलणारे नेते अशी अजितदादांची ख्याती आणि फैसला ऑन दी स्पॉट करत खटक्यावर बोट, जाग्यावर पलटी असा दादांच्या कामाचा खाक्या. याच आवेगात शरद पवारांची साथ सोडत दादा भाजपसोबत सत्तेत गेले. बारामतीच्या मैदानात पत्नी सुनेत्रा पवारांना उभंही केलं. मात्र आता रक्ताच्या नात्यातील कुटुंबीयांनीच दादांना घेरलंय. हे कमी म्हणून की काय, कधीकाळचे स्पर्धक असलेल्या बाहेरच्यांनीही विरोधाचं कुंपण उभं केलंय. त्यामुळे संघर्षाच्या उभ्या राहिलेल्या कौटुंबिक आणि राजकीय चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी दादांना जिकरीची मेहनत घ्यावी लागणार हे नक्की.
ही बातमी वाचा: