Ajit Pawar VIDEO: आपला शब्द म्हणजे शब्द, राहुल कुल राष्ट्रवादीत येऊ दे, उद्या मंत्री करतो : अजित पवार
Ajit Pawar Appeal To Rahul Kul : आम्ही काही साधू संत नाही, त्यामुळे एका हाताने मतं द्या आणि दुसऱ्या हाताने विकासकामं घ्या असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
पुणे : आतापर्यंत आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलो, पण राजकीय समीकरणं बदलत असतात असं सांगत राहुल कुल (Rahul Kul) राष्ट्रवादीत येऊ दे, उद्याच त्याला मंत्री करतो असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं. आपला शब्द म्हणजे शब्द, फडणवीसांना सांगतो राहुलला मंत्री करा असंही अजित पवार म्हणाले. दौडमधील सभेत ते बोलत होते.
कांचन कुल बाहेरच्या नाहीत
अजित पवार म्हणाल्या की, कांचन कुल काही बाहेरच्या नाहीत, त्या आपल्या घरच्याच आहेत. मागे काय झाले ते गंगेला मिळाले, हलक्या कानाचे राहू नका. मागे खासदार संसदेत गेले, ते भाषण करायचे. भाषण करून आर्थिक संपन्नता येणार नाही, आपले प्रश्न सुटणार नाही. मी राहुलला आणि तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. राहुलला घड्याळमध्ये यायला लावा, उद्या मंत्री करतो. येतोय का बघ, उद्या मंत्री आपण करणार. उद्या मी फक्त फडणवीस यांना सांगेल की पोरगा चांगला आहे, त्याला मंत्री केलं तर आमदार वाढतील.
बारातमी लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत अजित पवार आणि राहुल कुल यांच्यामध्ये राजकीय संघर्ष होता. आता सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार उभ्या आहेत. त्यामुळे बारामतीमध्ये अजित पवार आणि भाजप एकत्र आले आहेत.
तुम्ही फक्त बटण दाबा, बाकी मी बघतो
अजित पवार म्हणाले की, आम्ही एकमेकांचा बांध रेटला आहे का? भांड्याला भांड लागते. आपण शब्दाचे पक्के आहोत. आपण एकमेकांसोबत काम करु. आपण यातून मार्ग काढू. तुम्ही मला ढिगाने मते द्या, मला म्हणजे बायकोला. मी चांगली शिक्षण संस्था इथे काढतो. माझी अनेकांशी ओळख आहे, बाकी मी कसे काय करायचं ते करतो. तुम्ही फक्त बटणे दाबा.
चार दिवस सासूचे असतात
आतापर्यंत पवार साहेबांना जेवढं द्यायचे तेवढं दिलं, आता मला द्या असं आवाहन करत अजित पवार म्हणाले की, तुम्ही म्हणाल हा इतकं आता का करतो आहे आधी का केलं नाह? आता लक्षात आलं म्हणून करतोय. लोकांचा विरोध असलेली एकही गोष्ट आम्ही करणार नाही. काही जण म्हणतात सोयाबीन, कापसाला दर नाही. तुम्ही कधी हे पिकवले? दुधाचे काही लोकांना अनुदान मिळाले नाही. आचारसंहिता आहे म्हणून मला अधिकाऱ्यांना सांगता येत नाही
साहेबांना जेवढं द्यायचं त्यावेळी त्यांना भरभरून दिले. चार दिवस सासूचे आणि चार दिवस सुनेचे असतात. कांचन आमची घरची आहे, बाहेरची नाही. बास झालं आता भावनिक आवाहन. तुमचं वय झालं, पोराच्या हातात देता ना, मग द्या की आमच्या हातात. दिल्लीत मोदी कामाचा माणूस, इथे मी कामाचा माणूस. मग दौंडचा विकास होणार, पण घड्याळाचे बटन दाबायचे असं अजित पवार म्हणाले.
आम्ही साधू संत नाही, एका हाताने द्या, दुसऱ्या हाताने घ्या
आम्ही काही साधू संत नाही, त्यामुळे एका हाताने मतं द्या आणि दुसऱ्या हाताने विकासकामं घ्या असं आवाहन करत अजित पवार म्हणाले की, मी सकाळी 6 वाजता कामे बघायला जातो. दौंडमध्य मी अनेक कामे केली. मी कामे केली तर त्या भागातील लोक म्हणत होते की क्रेडिट राहुलला जाईल. गिरीश बापट यांनी नदी सुधार प्रकल्प आणला, मेट्रो आणली. बारामती लोकसभा मतदारसंघात विरोधात असलेल्यांची कामे होत नाहीत. येत्या 7 तारखेला घड्याळसमोरचं बटन दाबा. आम्ही काय साधू संत नाही, द्या आणि घ्या.
समीकरणं बदलतात
राष्ट्रवादी भाजपच्या विरोधात होता. आपण अनेक निवडणूक विरोधात लढलो. राजकारणात समीकरण बदलत असतात. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकार होईल असं वाटलं होतं का? काही जण म्हणतात अजितने साहेबांना सोडायला नव्हतं पाहिजे. ते म्हणतील तसे मी 1987 पासून मागच्या वर्षापर्यत ऐकत होतो. ते म्हणतील तशा भूमिका मांडल्या मी पण साठीच्या पुढे आलो.
आम्ही साहेबांना म्हणालो की मोदी म्हणतात की तुमच्या बोटाला धरून राजकारण केलं, तर आपण त्यांच्या सोबत जाऊ. अनेक नेत्यांनी यांच्यासोबत काम केलं, आपण जाऊ.
राहुल आज भावुक झाला. दौंडमध्ये विकास पाहिजे. साहेबाना सांगितले की तिथे विरोध कुणाचा नाही तर आपण सोबत जाऊ. जनता पक्षाचे काही दिवसात बस्तान बसले. मोदींना देशाने पाठिंबा दिला. साहेबांना सांगितले की आपण मोदींसोबत जाऊ. साहेब म्हणाले मी राजीनामा देतो. त्यांनी राजीनामा दिला आणि म्हणाले तू बघ. मी बघतो ना, माझी पण पकड आहे.