अजित पवारांकडून बारामतीमधील चुकीची कबुली; बहीण सुप्रिया सुळेंनी तीन शब्दात दिलं उत्तर
अजित पवार सध्या मीडियास्नेही झाले असून गुलाबी रंगाच्या जॅकेटसह त्यांचा महाराष्ट्र दौरा सुरू झाला आहे. त्यामध्ये, राज्यातील लाडक्या बहिणींना त्यांच्याकडून आवाहन केलं जात आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकीत अनेक हायव्होल्टेज लढती पाहायला मिळाल्या, त्यात सर्वात चर्चेतील आणि उत्सुकता ताणलेली निवडणूक म्हणजे बारामतीमधील (Baramati) ननंद विरुद्ध भावजय यांच्यातील होती. महायुतीकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर, सुनेत्रा पवार यांच्याविरुद्ध महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे मैदानात होत्या. त्यामुळे, बारामतीमधील पवार घराण्यातच पहिल्यांदा राजकीय फूट पडल्याचं दिसून आलं. मात्र, येथील लढतीत सुप्रिया सुळेंनी बाजी मारली. बारामतीकरांनी सुनेत्रा पवार यांना नाकारत सुप्रिया सुळेंना (supriya Sule) विजयी केली. या विजयावर शरद पवार (Sharad Pawar) यांनीही प्रतिक्रिया दिली होती. शेवट ते बारामती आहे, असे म्हणत सुप्रिया सुळेंच्या विजयावर शरद पवार बोलले. आता, बारामतीमधील सुनेत्रा पवारांची उमेदवारी ही माझी चूक होती, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. त्यावर, खासदार सुप्रिया सुळेंनीही केवळ तीन शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार सध्या मीडियास्नेही झाले असून गुलाबी रंगाच्या जॅकेटसह त्यांचा महाराष्ट्र दौरा सुरू झाला आहे. त्यामध्ये, राज्यातील लाडक्या बहिणींना त्यांच्याकडून आवाहन केलं जात आहे. याचदरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जय महाराष्ट्र या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बारामतीमधील लोकसभा निवडणुकांच्यावेळी पत्नी सुनेत्रा यांना देण्यात आलेली उमेदवारी ही माझी चूक होती, अशी कबुलीच दिली आहे. 'सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत, राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी आहे, मात्र सर्वच बहिणी माझ्या लाडक्या आहेत. अनेक घरांमध्ये राजकारण चालतं. पण, राजकारण घरांमध्ये शिरू द्यायचं नसतं. लोकसभेला मात्र माझ्याकडून चूक झाली. मी माझ्या बहिणीविरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं. निवडणुकीवेळी पक्षाच्या पार्लमेंट्री बोर्डाने सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला होता, पण आज माझं मन मला सांगतं तसं व्हायला नको होतं, अस अजित पवार यांनी म्हटलं होतं. अजित पवारांनी बहिणीबद्दल आपली चूक मान्य केली असून त्यावर आता सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
अजित पवारांनी केलेल्या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असून याबाबत खासदार सुप्रिया सुळेंनाही पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर, मी स्टेटमेंट ऐकलेलं नाही, अन् वाचलेलंही नाही. हे मी तुमच्याकडूनच ऐकतेय. त्यामुळे, राम कृष्ण हरी... अशी तीन शब्दातील प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
रक्षाबंधनावर काय म्हणाले अजित दादा
रक्षाबंधनाच्या सणाला अवघे काही दिवस शिल्लक असताना अजित पवार यांची ही कबुली चर्चेचा विषय ठरत आहे. बारामतीत पवार घराण्यातील दोन व्यक्तींना आमनेसामने लढवण्याची चूक लक्षात आल्यानंतर तुम्ही आता रक्षाबंधनाच्या सणाला सुप्रिया सुळे यांना भेटायला जाणार का, असा प्रश्न अजित पवार यांना मुलाखतीमध्ये विचारण्यात आला. त्यावर, आता माझा महाराष्ट्राचा दौरा सुरु आहे. रक्षाबंधनाच्यावेळी मी तिकडे असेन तर मी राखी बांधून घ्यायला बहिणींकडे जरुर जाणार, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.