नकवी यांच्या राजीनाम्यानंतर स्मृती इराणींकडे अल्पसंख्याक मंत्रालयाची जबाबदारी, तर शिंदे यांच्याकडे पोलाद मंत्रालय
Smriti Irani: मुख्तार अब्बास नकवी यांनी आपल्या केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर स्मृती इराणी यांच्याकडे अल्पसंख्याक कल्याण मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
Smriti Irani Appointed Union Minister For Minority Affairs: मुख्तार अब्बास नकवी यांनी आपल्या केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे अल्पसंख्याक कल्याण मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यासोबतच नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे पोलाद मंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीत अमेठीतून काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पराभव करून स्मृती इराणी संसदेत पोहोचल्या आहेत. तर ज्योतिरादित्य शिंदे हे मध्य प्रदेशमधून भाजपचे राज्यसभा खासदार आहेत.
तत्पूर्वी मुख्तार अब्बास नकवी यांनी बुधवारी राजीनामा दिला. ते अल्पसंख्याक कल्याण मंत्रालय सांभाळत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर नकवी यांनी राजीनामा दिला होता. नकवी यांनी आज त्यांच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीला हजेरी लावली. या बैठकीत पंतप्रधान मोदींनी मंत्री म्हणून नकवी यांच्या योगदानाचे कौतुक केले.
यासोबतच पोलाद मंत्री आरसीपी सिंह यांचीही आजची कॅबिनेट बैठक अखरेची होती. या बैठकीत पंतप्रधान मोदींनी दोन्ही केंद्रीय मंत्र्यांना निरोप देताना सांगितले की, मंत्री असताना या दोघांनीही देश हिताच्या विकासात मोलाचे योगदान दिले. या दोन्ही मंत्र्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ 7 जुलै रोजी संपत आहे. नकवी हे राज्यसभेचे सदस्य होते. त्यांचा कार्यकाळ गुरुवारी संपत आहे. यावेळी भाजपने नकवी यांना राज्यसभेवर पाठवले नाही. त्यामुळे पक्ष त्यांना मोठी जबाबदारी देऊ शकतो, अशी चर्चा आहे.
दरम्यान, मुख्तार अब्बास नकवी 26 मे 2014 रोजी नरेंद्र मोदी मंत्रालयात अल्पसंख्याक आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री बनले. 2016 मध्ये नजमा हेपतुल्ला यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांना अल्पसंख्याक मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार देण्यात आला होता. तर आरसीपी सिंह राजकारणात येण्यापूर्वी उत्तर प्रदेशमध्ये आयएएस अधिकारी होते. वर्षभरापूर्वी त्यांनी केंद्रीय पोलाद मंत्री म्हणून शपथ घेतली. ते जदयूच्या कोट्यातून मोदी मंत्रिमंडळात मंत्री झाले होते.
इतर महत्वाची बातमी: