सोलापूर आणि कोल्हापुरात महायुती आघाडीवर, माढ्यात काय? महाराष्ट्रातील हायव्होल्टेज मतदारसंघांचा सर्वात मोठा सर्व्हे!
ABP C Voter Opinion Poll : देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 17 एप्रिलला पार पडणार आहे.
ABP C Voter Opinion Poll : देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 17 एप्रिलला पार पडणार आहे. तर 7 मे रोजी माढा, कोल्हापूर आणि सोलापूर या लोकसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडणार आहे. दरम्यान, एबीपी माझा आणि सी व्होटर्सने देशभरातील जागांचा कल जाणून घेतलाय. महाराष्ट्रातील माढा, कोल्हापूर आणि सोलापूर लोकसभेच्या जागेवर कोणाचा विजय होऊ शकतो किंवा कोणाला आघाडी मिळू शकतो? घेऊयात...
कोल्हापुरात कोणाची आघाडी ?
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाकडून संजय मंडलिक यांच्या विजयाची शक्यता सर्व्हेने दर्शवली आहे. कोल्हापुरात शाहू महाराजांना धक्का बसू शकतो. कोल्हापुरात सध्या दोन्ही उमेदवारांनी जोरदार प्रचार सुरु केला आहे. संजय मंडलिक यांनी निवडणुकीत शाहू महाराजांच्या दत्तक प्रकरणाचा वाद पुढे आणलाय. तर कोल्हापुरात ठाकरेंचा खासदार असतानाही ही जागा त्यांनी काँग्रेसला दिली होती. मात्र, सर्व्हेमध्ये शाहू महाराजांच्या पराभवाची शक्यता वर्तवली जात आहे.
सोलापुरात प्रणिती शिंदेंना धक्का?
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने प्रणिती शिंदे यांना उमेदवारी दिली होती. तर प्रणिती शिंदे यांच्या विरोधात भाजपने राम सातपुते यांना मैदानात उतरवले होते. प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ते उपरे असल्याचा मुद्दा समोर आणला होता. त्यानंतर पुढे दोन्ही उमेदवार विकासाच्या मुद्द्यावरही बोलू लागलेत. मात्र, सोलापूर लोकसभा मतदारसंघातून इंडिया आघाडीला मोठा धक्का बसू शकतो. या जागेवरुन राम सातपुते यांना विजय मिळण्याची शक्यता ओपिनियन पोलमधून व्यक्त करण्यात येत आहे.
माढामध्ये धैर्यशील मोहितेंच्या विजयाची शक्यता
माढा लोकसभा मतदारसंघात नुकतेच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या धैर्यशील मोहिते पाटलांचा विजय होऊ शकतो, असा कल एबीपी आणि सीव्होटर्सच्या सर्व्हेतून व्यक्त केला जात आहे. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. तर शरद पवारांनी निंबाळकरांविरोधात धैर्यशील मोहितेंना उतरवले आहे. दरम्यान, या निवडणुकीत मोहिते पाटील घराणाने साथ सोडल्याने भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. घरचा कारभारी नीट असेल तर घरचा कारभार नीट होतो अशी टीका, धैर्यशील मोहिते पाटलांनी निंबाळकर यांच्याविरोधात शड्डू ठोकलाय. धैर्यशील मोहितेंना या मतदारसंघातून मोठे यश मिळण्याची शक्यता सर्वेमधून व्यक्त केली जात आहे.
(नोट : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. पहिल्या टप्प्यातील प्रचार 17 एप्रिल रोजी संपणार आहे. त्याआधी ABP न्यूजसाठी सी व्होटरनं देशभरात लोकांचा मूड जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. सी व्होटरनं एबीपी न्यूजसाठी 543 जागांवरील ओपिनियन पोल घेतला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 48 लोकसभा जागांचाही समावेश आहे. प्रकाशित करणाऱ्यात आलेल्या सर्व्हेमध्ये फक्त अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामध्ये अंतिम निकालावेळी म्हणजेच 4 जून रोजी बदल होऊ शकतो. ओपिनियन पोलच्या माध्यामातून फक्त लोकांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.)
इतर महत्वाच्या बातम्या