Andheri East Bypoll : 2019 च्या अकोला लोकसभा मतदारसंघातील पेचाची पुनरावृत्ती अंधेरी पोटनिवडणुकीत होणार?
Andheri East Bypoll : शासकीय सेवेचा राजीनामा स्वीकारण्यास प्रशासन दिरंगाई करत असल्याने ऋतुजा लटके यांची उमेदवारी धोक्यात आली आहे. असाच प्रकार 2019 मध्ये अकोला लोकसभा मतदारसंघात घडला होता.
Andheri East Bypoll 2022 : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गटाने ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. परंतु शासकीय सेवेचा राजीनामा स्वीकारण्यास प्रशासन दिरंगाई करत असल्याने ऋतुजा लटके यांची उमेदवारी धोक्यात आली आहे. ऋतुजा लटके या मुंबई महापालिकेच्या (BMC) कर्मचारी आहेत. त्यांचा राजीनामा अद्याप महापालिकेकडून मंजूर झाला नसल्याचा पेच आता मविआपुढे आहे. असाच प्रकार 2019 मध्ये अकोला लोकसभा मतदारसंघात (Akola Lok Sabha Constituency) घडला होता.
अकोल्यात काय घडलं होतं?
एक नवा चेहरा म्हणून काँग्रेसने डॉ. अभय पाटील यांचे नाव उमेदवार म्हणून निश्चित केले होते. त्यांच्या नावाच्या घोषणेची केवळ औपचारिकता शिल्लक होती. काँग्रेस पक्षाने तटस्थ यंत्रणांमार्फत केलेल्या अनेक सर्वेक्षणात अकोल्याचे तत्कालीन भाजप खासदार आणि त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री झालेले संजय धोत्रे यांना अटीतटीची टक्कर देण्याची सर्वाधिक क्षमता डॉ. अभय पाटील यांच्याकडे असल्याचा निष्कर्ष समोर आला होता. मात्र, डॉ. अभय पाटील पूर्वी शासकीय सेवेत होते. त्यांनी आपला राजीनामा देखील दिलेला होता. मात्र तत्कालीन राज्य सरकारने अखेरपर्यंत डॉ. अभय पाटील यांचा राजीनामा स्वीकारला नाही. सरतेशेवटी काँग्रेस पक्षाला उमेदवार बदलावा लागला होता. राजीनामा वेळेत मंजूर न झाल्याने काँग्रेसकडून नाईलाजाने 2019 मध्ये डॉ. अभय पाटील यांच्याऐवजी हिदायत पटेल यांना उमेदवारी देण्यात आली होती.
राजीनामा मंजूर करण्यासाठी ठाकरे गटाची धावाधाव
ऋतुजा लटके या मुंबई महापालिकेत प्रशासकीय विभागात कार्यरत आहेत. राजीनामा अर्ज त्वरीत मंजूर करण्यासाठी शिवसेनेचे विभागप्रमुख अनिल परब यांच्यासह शिवसेनेच्या इतर नेत्यांची धावाधाव सुरु आहे. महापालिकेच्या काही विभागांची या राजीनामा अर्जाला एनओसी मिळणं अद्याप बाकी आहे. महापालिका नियमानुसार सेवेची किमान 20 वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यालाच राजीनामा किंवा स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज करता येतो. हा अर्ज तीन महिन्यांच्या कालावधीत कधीही मंजूर केला जाऊ शकतो. परंतु तीन महिन्यांमध्ये यावर कोणताही निर्णय न घेतल्यास आणि संबंधित कर्मचाऱ्याला याबाबत न कळवल्यास त्याचा अर्ज मान्य झाला, असे गृहित धरुन पुढील कार्यवाहीसाठी संबंधित कर्मचारी अर्ज करु शकतो. दरम्यान आज ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर होऊन हा पेच सुटण्याची शक्यता आहे. तसे प्रयत्न सुरु असल्याचं महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत.
ऋतुजा लटके शिंदे गटात?
दुसरीकडे ऋतुजा लटके यांना शिंदे गटात आणण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. भाजपकडून मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज अजूनही भरला नसल्याने चर्चेला उधाण आलं आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी फक्त दोन दिवस उरले आहेत. उद्या ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांचा उमेदवारी अर्ज भरणार असल्याची अनिल परब यांनी दिली आहे. परंतु ऋतुजा लटके यांचा राजीनामा अजूनही प्रलंबित आहे.
संबंधित बातम्या