रायगड फिरायला जाताय, हे वाचा; पर्यटकांसाठी किल्ल्याची पायरी वाट बंद, प्रशासनाचा मोठा निर्णय
मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील प्रशासन सतर्क झालं असून पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने किल्ले रायगडावर जाणाऱ्या पारंपरिक पायरी मार्गावर तातडीने बंदी घालण्यात आली आहे.

Raigad: राज्यभरात पावसाचा जोर चांगलाच वाढला असून मुंबई उपनगरासह बहुतांश ठिकाणी पावसाची हजेरी लागतेय. पुणे सातारा घाटमाथ्यासह कोकण किनारपट्टीवर अतिमुसळधार पावसाचे तीव्र इशारे देण्यात आले आहेत. दरम्यान, पावसाळ्यात रायगड किल्ल्याला भेट देण्याचा विचार करत असाल तर आधी हे वाचा. मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील प्रशासन सतर्क झालं असून पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने किल्ले रायगडावर जाणाऱ्या पारंपरिक पायरी मार्गावर तातडीने बंदी घालण्यात आली आहे. पूर्ण पावसाळा ऋतू संपेपर्यंत हा पायरी मार्ग बंदच ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे.
पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका
रायगड किल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्यांच्या मार्गावर मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याशिवाय, या मार्गावर पावसाचे पाणी वेगानं वाहत असल्यामुळे पर्यटकांना धोका निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने वेळेत निर्णय घेत, कोणतीही जीवितहानी होऊ नये म्हणून पायरी मार्ग पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा आदेश जारी केला आहे.
पर्यटकांनी सहकार्य करावं ,प्रशासनाची विनंती
या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करण्यात आली असून, पर्यटकांनी प्रशासनाशी सहकार्य करावं, असा आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. पर्यायी मार्गाने किल्ल्यावर जाण्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत सूचना दिली गेलेली नाही. त्यामुळे पर्यटकांनी काही दिवसांची संयम बाळगावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असंही सांगण्यात आलं आहे. हा निर्णय जिल्हाधिकारी किशन जावळे आणि रायगडचे पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून पावसाळ्याच्या कालावधीत किल्ल्याच्या इतर मार्गांबाबतही नियमितपणे निरीक्षण ठेवण्यात येत आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलेला असल्यामुळे, रायगड परिसरात कोणताही अपघात घडू नये, यासाठी ही काळजी घेतली जात आहे.
रायगड जिल्ह्यात तुफान पाऊस
सकाळपासून झालेल्या मुसळधार पावसाने महाड तालुक्याला चांगलेच झोडपून काढले त्यामुळे महाड तालुक्यात सावित्री नदीने धोका पातळी ओलांडली आहे ही नदी आता दुथडी भरून वाहू लागल्यामुळे महाड तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाला आहे.2021 मध्ये याच सावित्री नदीने रौद्ररूप धारण करून संपूर्ण महाड शहराला घेराव घातला होता. त्यामुळे सतर्क म्हणून महाड करांना सावधानतेचा इशारा स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आला आहे. खबरदारी म्हणून सावित्री नदीच्या किनारपट्टीवर राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
रायगड जिल्ह्यातील प्रामुख्याने ज्या पूरपरिस्थिती निर्माण करणाऱ्या नद्या आहेत त्या आंबा, कुंडलिका आणि सावित्री नदी या धोका पातळीपर्यंत पोहचल्या आहेत त्यामुळे या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.सध्या पावसाने उघडीप घेतली असली तरी पुढील काही तासात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
हेही वाचा


















