Nagpur : वाघ आणि बिबट्याच्या अवयवांची सर्वाधिक तस्करी, वर्षभरात 177 आरोपींना अटक
वाघांच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या 54 आणि बिबट्याची शिकार करणाऱ्या 31 आरोपींचा समावेश आहे. आरोपींकडून वाघ आणि बिबट्याचे कातडे, दात, नखे, कवटी आणि हाडे जप्त करण्यात आली आहेत.
नागपूरः वन्य प्राण्यांच्या शिकारीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. वर्षभरात 177 आरोपींना विविध प्रकरणांमध्ये अटक करण्यात आली आहे. जंगलातील शिकार वाढल्याने वन्यजीवप्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शिकाऱ्यांना आवर घालण्यासाठी वनविभागाने विशेष योजना आखली आहे. त्याअंतर्गत विशेष तस्करी विरोधी पथक स्थापन करून जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. वन्य प्राण्यांची शिकार थांबविण्यासाठी वन्यजीव संरक्षण कायदा 1972 मध्ये लागू करण्यात आला.
या कायद्यान्वये शिकार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होतो. मोठ्या शिक्षेची तरतूद असूनही वन्य प्राण्यांच्या शिकारीच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यांना आळा घालण्यासाठी वनविभागाने 29 जुलै 2021 रोजी नागपूर विभागात विशेष तस्करी विरोधी पथकाची स्थापना केली. विशेष पथकाने तत्परतेने कारवाई करत वर्षभरात 177 आरोपींना अटक करण्यात आली. त्यात वाघांच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या 54 आणि बिबट्याची शिकार करणाऱ्या 31 आरोपींचा समावेश आहे. आरोपींकडून वाघ आणि बिबट्याचे कातडे, दात, नखे, कवटी आणि हाडे जप्त करण्यात आली असून, यावरून वाघ आणि बिबट्याच्या अवयवांची सर्वाधिक तस्करी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जादूटोण्यासाठी वापर
वन्य प्राण्यांच्या अवयवांचा जादूटोण्यासाठी उपयोग केला जात असल्याचे अनेक प्रकरणांमध्ये समोर आले आहे. गेल्या महिन्यातच सीताबर्डी भागातील एका दुकानातून वन्य प्राण्यांचे अवयव जप्त करण्यात आले होते. याशिवाय व्हेल माश्याच्या उलटीची तस्करी करणाऱ्यासही अटक करण्यात आली होती. यावरून उच्चभ्रू कुटुंबातील लोकही जादूटोण्यासाठी वन्य प्राण्यांचे भाग खरेदी-विक्रीच्या व्यवसायात गुंतलेले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अधिकारी म्हणतात शिकारीत घट
वाघ आणि बिबट्यांच्या शिकारीत घट झाली असल्याचा वन अधिकाऱ्यांचा दावा आहे. कोरोनापूर्वी वन्य प्राण्यांचे अवयव घरात लपवून ठेवणारे आता पैशाच्या कमतरतेमुळे बाजारात अवयव विक्रीसाठी पोहोचत आहेत. जनजागृतीतूनच शिकारीच्या घटना थांबवता येतील, असे ते म्हणाले.
वाघांच्या मृत्युच्या घटना
वर्ष | शिकार |
2016 | 01 |
2017 | 09 |
2018 | 03 |
2019 | 06 |
2020 | 08 |
2021 | 06 |
बिबट्याच्या मृत्युच्या घटना
वर्ष | शिकार | विजेच्या धक्क्याने |
2016 | 07 | 0 |
2017 | 09 | 0 |
2018 | 07 | 0 |
2019 | 09 | 0 |
2020 | 21 | 10 |
2021 | 04 | 02 |