Eknath Shinde : शिंदेसेनेची विदर्भातील शिवसैनिकांना 'ऑफर', पांडव कॉलेजमध्ये बैठक
शिवसेनेचे जिल्हा प्रमुख किशोर कुमेरिया यांनाही भेटायला ठाण्यातील काही लोक येऊन गेल्याची माहिती आहे. त्यांना ऑफर त्यांना दिल्याचे समजते. मात्र कुमेरिया यांनी ही ऑफर धुडकावून लावल्याचे कळते.

नागपूरः माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला धक्का देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थकांनी सर्व पातळींवरुन फिल्डिंगला सुरुवात केली आहे. शिंदे समर्थक मोठ्या प्रमाणात विदर्भात दाखल झाले आहेत. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना शिंदे गटात सहभागी होण्याचे आवाहन केले जात असून या करिता चांगल्या पदाची ऑफरही दिली जात आहे. या सदंर्भात नुकतीच उमरेड मार्गावरील पांडव अभियांत्रिकी महाविद्यालयात विदर्भातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आल्याची माहिती आहे. बैठकीत जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली होती हे विशेष. शिवसेनेला सर्व पातळ्यांवर चित्त करण्यासाठी शिंदे समर्थकांनी कंबर कसली असल्याचे चित्र आहे.
उमरेड मार्गावरील पांडव महाविद्यालयात बैठकीला रामटेक विधानसभा मतदारसंघ तसेच ग्रामीण भागातील बऱ्याच पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती असे कळते. शहरातील काही पदाधिकाऱ्यांनासुद्धा बैठकीला बोलविण्यात आले होते. काही दूत त्यांच्यासोबत सकाळीच चर्चेसाठी पाठवण्यात आळे होते. शिवसेनेच्या बारा खासदारांमध्ये रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांचा समावेश असल्याने ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सेनेला भगदाड पडणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. विशेष म्हणजे रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल यापूर्वीच शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्यांनी आपल्या तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनाही सोबत नेले आहे. यानंतरही बड्या नेत्यांकडून कुठलेही ऑपरेशन होत निष्ठावंत हतबल झाले आहेत. शिंदे यांच्यासोबत राहयचे की उद्धव ठाकरे यांच्यासोबत या विचाराने अनेक शिवसैनिक संभ्रमात पडले आहेत.
शिवसेनेचे जिल्हा प्रमुख किशोर कुमेरिया यांनाही भेटायला ठाण्यातील काही लोक येऊन गेल्याची माहिती आहे. शिवसेनेत काही ठेवले नाही त्यापेक्षा आमच्यासोबत या. तुमचा योग्य सन्मान केला जाईल अशी ऑफर त्यांना दिल्याचे समजते. मात्र कुमेरिया यांनी ही ऑफर धुडकावून लावल्याचे कळते. जिल्ह्यातील अनेक शिवसैनिकांनी शिंदे गटाने संपर्क साधला असल्याचे नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर सांगितले.
जबाबदारी कोणावर?
शिंदे समर्थकांचे सुमारे 50 जणांचा गट विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये गेला आहे. नागपुरची बैठक आटोपल्यानंतर सोमवारी गडतचिरोली येथील एका हॉटेलमध्ये बैठक झाल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील बरेच पदाधिकारी यावेळी उपस्थितही होते अशी माहिती आहे. शिंदे यांचे विदर्भातील 'खास' म्हणून ओळख असलेल्या नेत्याकडे पूर्व विदर्भाची जबाबदारी सोपविण्यात आली असल्याचे समजते.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
