माझ्या मुलाला पोलिसांनी मारून टाकायचे नव्हते; भरसभेत आईचा टाहो, न्यायासाठी प्रकाश आंबेडकरांवरच विश्वास
सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळवून देण्यासाठी तसेच आंबेडकर वाद्यांवर झालेल्या अत्याचाराविरोधात आज परभणीत वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वात शांतता मार्च काढण्यात आला.

परभणी : जिल्ह्यातील सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryavanshi) यांच्या मृत्यूला चार महिने उलटून गेले तरी न्याय मिळत नसल्याने आज वंचित बहुजन आघाडीकडून परभणी (Parbhani) शहरात शांतता मार्चचे आयोजन करण्यात आले होते. या मार्चचे नेतृत्व प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकरांनी केले. शहरातील शनिवार बाजार मैदानापासून ह्या मार्चला सुरूवात झाली असून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मार्च काढण्यात आला. दरम्यान, या मार्चनंतर आयोजित स्थळावर भाषण करताना सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईला अश्रू अनावर झाले. पोलिसांनी माझ्या लेकराला मारुन टाकयचे नव्हते, असा टाहोच माऊलीने सुजात आंबेडकर यांच्यासमोर फोडला. तसेच, प्रकाश आंबेडकर हे आम्हाला न्याय देऊ शकतात, असेही त्यांनी म्हटले.
सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळवून देण्यासाठी तसेच आंबेडकर वाद्यांवर झालेल्या अत्याचाराविरोधात आज परभणीत वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वात शांतता मार्च काढण्यात आला. शांतता मार्ग झाल्यानंतर सभा झाली, या सभेत मृत सोमनाथ सूर्यवंशींच्या आईने देखील आपले मनोगत व्यक्त केले. मात्र, ते मनोगत व्यक्त करताना त्या ढसाढसा रडू लागल्या. माझ्या मुलाला पोलिसांनी मारून टाकायचे नव्हते, माझ्या मुलाला सर्वांसोबत थोडीफार शिक्षा करायला पाहिजे होती, असा टाहोच त्यांनी भरसभेत फोडला. आता, माझा सरकार व आणि पोलिसांवर कसल्याही प्रकारचा विश्वास नाही, मला फक्त आता बाळासाहेब आंबेडकर यांच्यावरच विश्वास आहे आणि तेच मला न्याय मिळवून देऊ शकतात, असेही सोमनाथ सूर्यवंशीची आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी यावेळी म्हटले. विशेष म्हणजे यावेळी, त्यांच्याच शेजारी सुजात आंबेडकर हेही बसलेले होते. आईच्या ह्या वेदना पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले. दरम्यान, या मार्चमध्ये मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांची आई देखील सहभागी झाली होती.
न्यायालयीन कोठडीत सोमनाथचा मृत्यू
परभणी हिंसाचार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. 15 डिसेंबर रोजी न्यायालयीन कोठडीत असताना तुरुंगात त्यांचा मृत्यू झाला होता. सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाल्याचा आरोप कुटुंबीयांना केला आहे. पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांनी केला होता. विशेष म्हणजे याप्रकरणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवाल समोर आला आहे, ज्यात पोलिसांच्या मारहाणीतचं सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्याच, अनुषंगाने संबंधित पोलिसांवर कारवाईची मागणी केली जात आहे.
हेही वाचा
Aadhar आधार केंद्र चालकांसाठी गुडन्यूज; मानधनात वाढ, नवीन आधार कीटही दिले
























