Parbhani News : दिवाळीच्या पहिल्याच दिवशी कुटुंबावर दु:खाचा डोंगर, परभणीत मराठा आरक्षणासाठी तरुणानं आयुष्य संपवलं
Parbhani News : परभणीत दिवळीच्या पहिल्याच दिवशी मराठा आरक्षणासाठी त्याचं आयुष्य संपवलं. या घटनेमुळे संपूर्ण गावामध्ये एकच शोककळा पसरली.
परभणी : परभणीत (Parbhani) पुन्हा एकदा एका तरुणाने मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. मराठा आरक्षणाबाबत कुणीही टोकाचे पाऊल उचलू नये, असं आवाहन शासन, प्रशासन आणि मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात येतय. पण तरीही तरुणांच्या आत्महत्येचं सत्र काही केल्या थांबत नसल्याचं चित्र सध्या आहे. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी परभणीतील तरुणाने उचललेल्या टोकाच्या पावलामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. माणिका महादू वाकोडे असं या तरुणाचं नाव आहे.
परभणीच्या पूर्णा तालुक्यातील लोण खुर्द या गावातील 22 वर्षीय तरुणाने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली. वसुबारसेच्या दिवशीच तरुणानं टोकाचं पाऊल उचलच आयुष्य संपवलं. गळफास घेऊन या तरुणाने आत्महत्या केली. मराठा आरक्षण मिळत नसल्यामुळे आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी या तरुणाने लिहून ठेवली होती. त्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली.
शेतात आत्महत्या करत संपवलं आयुष्य
सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा हा चांगलाच पेटल्याचं चित्र आहे. त्यातच अनेक ठिकाणी जाळपोळीच्या देखील घटना घडल्या तर अनेक तरुणांनी आपलं आयुष्य संपवलं. महादू याने देखील शेतात गळफास घेत आत्महत्या केली. माणिक हा तरुण मराठा आरक्षणासाठी अग्रेसर होता. मराठा आरक्षणासाठीच्या अनेक आंदोलनात त्याने सहभाग देखील घेतला होता. त्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळतय का नाही या संभ्रमात असतानाचा आज माणिकने आत्महत्या केली. मराठा आरक्षणासाठी आपण जीवन संपवत असल्याची एक चिठ्ठी लिहून शेतात गळफास घेत आत्महत्या केलीय. या घटनेनंतर पोलिसांनी पंचनामा केला असुन ती चिट्ठी ही पोलिसांनी जप्त केली आहे.
हिंगोली जिल्ह्यात तरुणाची आत्महत्या
मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आत्महत्या काही थांबायला तयार नाहीत. हिंगोली जिल्ह्यात आणखी एका तरुणाने मराठा आरक्षण मिळत नसल्याने आपलं जीवन संपवलं या तरुणाने घरातील विजेच्या तारांना पकडून आत्महत्या केली. तसेच, आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक चिठ्ठी देखील लिहून ठेवली. ज्यात, मराठा समाजात जन्म झाला हा माझा गुन्हा आहे काय?, असा त्याने उल्लेख केला. आदिनाथ राखोंडे (वय 27 वर्षे) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.
जरांगेंचा महाराष्ट्र दौरा, आत्महत्या रोखण्यासाठी करणार आवाहन...
मनोज जरांगे हे 15 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर असा राज्याचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात ते गावागावात सभा घेणार आहे. एकूण 6 टप्प्यात हा दौरा असणार आहे. या दौऱ्यात जरांगे हे ठाणे, पालघर, नाशिक, त्र्यंबकेश्वर,नेवासा, संगमनेर आणि श्रीरामपूर यासह अनेक ठिकाणी भेट देणार आहे. सोबतच 1 डिसेंबरपासून राज्यातील प्रत्येक गावागावात साखळी उपोषण केले जाणार असल्याचे जरांगे म्हणाले आहे. विशेष म्हणजे आपल्या या दौऱ्यात प्रत्येक ठिकाणी मनोज जरांगे हे आरक्षणासाठी आत्महत्या करू नका असे आवाहन करणार आहे.
हेही वाचा :
'मराठा समाजात जन्म झाला हा माझा गुन्हा आहे काय'?; विजेच्या तारांना पकडून तरुणाची आत्महत्या