Maratha Reservation : जरांगेंचा रोख कुणाकडे? आरक्षणाच्या आड येणाऱ्यांची लवकरच नावं सांगणार, त्यांना गुलाल लागू देणार नाही; जरांगेंचा रोख कुणाकडे?
Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या परभणीतील सभेला मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. जरांगेंचा पाचव्या टप्प्यातील दौरा सुरु आहे.
Maratha Reservation Update : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) आड येईल त्याला आयुष्यभर गुलाल लागू द्यायचा नाही, वेळ येईल तेव्हा आरक्षणाच्या मार्गात येणाऱ्यांची नावंही सांगणार असं म्हणत मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी आरक्षणाच्या मार्गात येणाऱ्यावर निशाणा साधला आहे. मनोज जरांगेंच्या परभणीतील सभेला मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. जरांगेंचा पाचव्या टप्प्यातील दौरा सुरु आहे. परभणीच्या सेलूमध्ये शुक्रवारी मनोज जरांगेंची भव्य सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणात अडथळा आणण्यांवर नाव न घेता निशाणा साधला आहे.
तुमच्या नोटीसा, धमक्यांना घाबरणार नाही : जरांगे
करोडोंच्या संख्येने मराठे एकत्र आले, ही लाट आता साधीसुधी नाही. तुमच्या नोटीसीला घाबरून ही लाट मागे फिरणार नाही. धमक्यांना घाबरत नाही, आम्ही धमक्या देत नसतो. आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात आहे. लोकशाहीप्रमाणे लढा सुरु आहे. ही सभा नाही, मराठ्यांची वेदना आहे, मराठ्यांनी 80 टक्के लढाई जिंकली आहे, असंही जरांगे यांनी म्हटलं आहे.
आंतरवाली सराटीमधील हल्ल्याचा निषेध
मनोज जरांगे यांनी यावेळी सांगितलं की, ''आंतरवाली सराटीमध्ये आंदोलनावर हल्ला केला. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी उपोषण करणाऱ्यांवर हल्ला केला. माता-भगिनींच्या डोक्याच्या चिंधड्या-चिंधड्या केल्या. मांडीवर चार महिन्यांचं लेकरू घेऊन बसलेल्या महिलेचं डोकं फुटलं.'' त्या महिलांना इतकं काय केलं होतं की, सरकारने इतका भीषण हल्ला केला, असा सवाल जरांगे यांनी उपस्थित केला आहे. याचं उत्तर अजून सरकारला देता आलेलं नाही, असं म्हणत जरांगे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
शासकीय नोंदी सापडूनही मराठ्यांना का आरक्षण नाही?
सरकारने आता भानावर यावं. शासकीय नोंदी सापडूनही मराठ्यांना आरक्षण का नाही. गायकवाड आयोगाने मराठ्यांना 12 ते 13 टक्के मागास सिद्ध केलंय. सगळे निकष असूनही मराठ्यांना आरक्षण का नाही, असा प्रश्न जरांगेंनी उपस्थित केला आहे. तुम्हाला नोटिसा द्यायला काय होतंय. मराठ्यांनी ठरवलं तर आयुष्यभर तुम्हाला गुलाल लागू देणार नाही, असा इशाराही जरांगे यांनी दिला आहे.
'मराठ्यांनी मैदानात या, तुमच्या जीवावर मी लढतोय'
मराठ्यांनी मैदानात या. आता हटायचं नाही, तुमच्या जीवावर मी लढतोय. शक्ती कमी होऊ देत नाही. हे आरक्षण कसं देत नाही ते बघतो, नोटिसीला घाबरत नाही, आरक्षण घेतल्याशिवाय राहत नाही. सरकारने या आधी वेळ मागितला. आरक्षणाचा लढा अंतिम टप्प्यात आहे. मराठ्यांनी सावध व्हा, एकजूट राहा, अशी संधी पुन्हा येणार नाही, आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटू नका, असं आवाहन जरांगेंनी मराठा बांधवांना केलं आहे.