Parbhani News: परभणीकरांना गडकरींकडून मिळाली गुड न्यूज; जिल्हा समृद्धी महामार्गाने जोडणार
Nitin Gadkari: परभणी जिल्ह्यातील महत्वाच्या विकास कामांचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे हस्ते झाले.
Parbhani News: परभणी जिल्ह्यात (Parbhani District) काळी कसदार जमीन असल्यामुळे डांबरी रस्ते दीर्घकाळ टिकत नाहीत. त्यामुळे आगामी काळातील सर्व रस्ते हे सिमेंटपासून बनविण्यात येतील. महामार्गाच्या माध्यमातूनच जिल्ह्याचा विकास होतेा. त्यामुळे परभणी जिल्हा समृद्धी महामार्गाने (Samruddhi Mahamarg) पुणे आणि मुंबईला जोडणार असल्याची ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी जिल्हावासीयांना दिली आहे. पारवा-असोला बाह्यवळण रस्ता, जिंतूर-शिरड शहापूर आणि पाथरी ते सेलू या राष्ट्रीय महामार्गांच्या चौपदरीकरण आणि सुधारणेच्या भूमिपूजन व कोनशिलेचे अनावरण केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परिसरात आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना गडकरी म्हणाले की, परभणी जिल्ह्याला समृध्दी महामार्गाद्वारे पुणे-मुंबईला कसे जोडता येईल, याकरिता आजच योजना तयार करायच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. गढी ते मानवत 500 कि.मी. चा रस्ता पूर्ण झाला आहे. परभणी जिल्ह्यात काळी जमीन असल्याने याठिकाणचे संपूर्ण रस्ते हे सिमेंट काँक्रिटचे करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. 972 कोटी रुपयांची 145 किलोमीटरची 4 कामे जी राष्ट्रीय महामार्ग विभाग करत असून ती प्रगतीपथावर आहेत. त्यात काही अडचणी होत्या, परंतू त्या आता सोडविण्यात आल्या आहेत. कोल्हा ते नसरतपूर, परभणी ते गंगाखेड, वाटूर ते चारठाणा आणि परळी ते गंगाखेड ही सुमारे 1 हजार कोटीची 145.29 किलोमीटरची ही सर्व कामे पुढील सहा महिन्यात पूर्ण होणार असल्याचं गडकरी म्हणाले आहेत.
स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी
तसेच गंगाखेड बायपासची मागणी करण्यात आली असून, त्याला राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्पात समाविष्ट करुन हे काम करण्यात येईल. तसेच परभणी शहरात जाणारा मुख्य रस्त्याचे देखील विस्तारीकरण व सौंदर्यीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यावेळी केली. जिल्ह्यात विविध सुविधांसह औद्योगिक वसाहत निर्माण केल्यास यामुळे स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या शेतमालालाही चांगला भाव मिळणार असल्याचं गडकरी म्हणाले.
कंत्राटदारांच्या कामाच्या दर्जावर लक्ष ठेवले पाहीजे
जिल्ह्यातील रस्ता बांधकामसाठी गेल्या तीन वर्षांपासून भूसंपादनाची प्रक्रिया रखडली आहे. ही कामे वेळेत का होत नाहीत, याचा गांभिर्याने विचार करण्याचे सांगत, जिल्ह्यात कमी किमतीत रस्ते बांधणी करणाऱ्या कंत्राटदारांच्या कामाच्या दर्जावर लक्ष ठेवले पाहीजे. त्यांनी चांगले रस्ते बांधावेत, यासाठी लोकप्रतिनिधींनी सातत्याने पाठपुरावा केला पाहीजे. जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात 12 रस्ते बांधणी प्रकल्प पूर्ण झाले असून, ऊर्वरित 11 रस्त्यांचे कामही येत्या सहा महिन्यात पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास गडकरी यांनी यावेळी दिला.
इतर महत्वाच्या बातम्या:
Nitin Gadkari : कंत्राटदारांना ब्लॅकमेल करण्यासाठी तक्रारी करू नका; भरसभेत गडकरी थेटच बोलले