Bachchu Kadu : शेतकऱ्यांऐवजी जातीसाठी लढलो असतो तर लोकांनी डोक्यावर घेतलं असतं; बच्चू कडूंची खंत
Bachchu Kadu Parbhani Speech : शरद जोशींनी आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी लढा दिला, पण निवडणुकीमध्ये त्यांना एका गंजेडी युवकाने पाडले असं म्हणत माजी आमदार बच्चू कडूंनी जातीय राजकारणावर टीका केली.

परभणी : जाती-जातीत भांडण लावून राजकारणी लोकांना अडकवत आहेत, त्यांच्या खेळीला बळी पडू नका असं आवाहन माजी आमदार आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केलं. शेतकऱ्यांसाठी लढून शेतकरी साथ देत नाहीत. त्याऐवजी जर जातीसाठी लढलो असतो तर लोकांनी डोक्यावर घेतलं असतं अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. परभणीच्या पिंगळी गावात प्रहार संघटनेकडून आयोजित शेतकरी शेतमजूर हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बच्चू कडू यांनी सध्या राज्यात सुरू असलेल्या जातीकरणावर भाष्य केले.
शेतकऱ्यांसाठी लढून ते साथ देत नाहीत
बच्चू कडू म्हणाले की, "एवढा मोठा अर्थतज्ज्ञ, शेतकऱ्यांसाठी घरावर तुळशीपत्र ठेवून लढणारे शरद जोशी हे 34 वर्षाच्या गंजटी मुलाकडून पराभूत होतात, का तर फक्त त्यांची जात आडवी आली. बाबासाहेबांना पाडले गेले का तर आमच्या जातीचा माणूस पाहिजे म्हणून. अरे, मी जर जातीसाठी लढा दिला असता तर लोक डोक्यावर घेतील. पण शेतकऱ्यांसाठी लढून शेतकरी साथ देत नाहीत. राजकारण्यांच्या जाती-जातीत भांडण लावून देण्याच्या षडयंत्राला बळी पडू नका."
बच्चू कडू पुढे म्हणाले की, "शेतकऱ्यांनी त्यांच्यासाठी लढणाऱ्यांची कधीच साथ दिली नाही. शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, अहिल्यादेवी, जोतिबा-सावित्रीबाई यांच्या सगळ्यांच्या जाती काढल्या गेल्या. ज्या शरद जोशींनी शेतकऱ्यांसाठी लढा लढला, पाच-पाच लाख लोक ज्यांच्या आंदोलनात सहभागी व्हायचे, त्यांना केवळ जात आडवी आली. वर्ध्याच्या हिंगणघाट येथे केवळ 34 वर्षाचा मुलाने त्यांना पाडले."
भाजपने 'बटेंगे तो कटेंगे' करून तुमचे मत घेतले. आता हिंदू जगला पाहिजे असे वाटते का? ज्या प्रभू रामचंद्रांनी लोकांसाठी सीतेला अग्निपरीक्षा द्यायला लावली तो आदर्श भाजप घेणार का? असा सवालही बच्चू कडू यांनी विचारला.
देवेंद्र फडणवीस मोठे आका
माजी आमदार बच्चू कडूंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री फडणवीसांवर टीकेची झोड उठवली आहे. राज्यातील पीकविमा कंपन्यांचा दाखला देत त्यांनी फडणवीसच मोठे आका आहेत असा हल्लाबोल केला. राज्यात अर्ध्याहून जास्त मंत्री आका आहेत आणि फडणवीस मोठे आका आहेत असं बच्चू कडू म्हणाले. पीकविमा कंपन्या फसव्या आहेत, त्यामुळे देशात भ्रष्टाचार करण्याची स्पर्धा लागली आहे असा आरोप त्यांनी केला.
ही बातमी वाचा:























