सामाजिक कार्यकर्त्या मंजुषा दर्डा यांच्या गाडीवर हल्ला; पालम पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल
Parbhani News : सामाजिक कार्यकर्त्या मंजुषा दर्डा यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला असून यासंदर्भात पालम पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Parbhani News : परभणीच्या (Parbhani) गंगाखेड येथील सामाजिक कार्यकर्ता मंजुषा दर्डा यांच्या गाडीचा पाठलाग करत त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची धक्कादाय घटना घडली आहे. या प्रकरणात पालम पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.
सामाजिक कार्यकर्त्या मंजुषा दर्डा या पूजा दर्डा, सुजाता पेकम यांच्यासह नांदेडच्या उमरी येथे कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त गेल्या होत्या. गंगाखेडला त्या परतत असताना शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास लोहा येथून गाडीनं परतत असताना एक गाडी दर्डा यांच्या गाडीचा पाठलाग करत त्यांना वारंवार ओव्हरटेक करत होती.
पालम नजीक शांतीस्वरूप पेट्रोल पंपाजवळ येताच संबंधित आरोपी वाहन चालकानं त्याची गाडी मंजुषा दर्डा यांच्या गाडीवर पाठीमागून आदळली. याठिकाणी मंजू दर्डा यांचे गाडीचालक हरिभाऊ बालाजी आंधळे या चालकास आरोपीनं मारहाणही केली. या संपूर्ण घटनेनं मंजुषा दर्डा घाबरल्या. घटनेनंतर त्यांनी गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी श्रेणिक लोढा यांच्याशी सातत्यानं संपर्क करत पालम पोलिसांची मदत घेतल्यानं मोठा अनर्थ टळला. दरम्यान, संबंधित आरोपी चालकानं गाडीस जोरदार धडक दिल्यामुळे गाडीतील उपस्थित असलेल्या मंजुषा दर्डा यांच्यासह 2 जणांना दुखापत झाली आहे. याप्रकरणी मंजूषा दर्डा यांनी पालम पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दर्डा यांच्या तक्रारीवरून आरोपी वाहन चालकाविरुद्ध कलम 337, 336, 379, 341, 427, 232, 504, 134(अ)(ब), 184 भादवि अन्वये पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल राजेश्वर शिवराज पाटील हे करीत आहेत. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी वाहन चालक फरार झाल्यानं अद्याप त्याला अटक झालेली नाही.
दरम्यान, अनेक वर्षांपासून गंगाखेड शहर तालुका जिल्हा आणि मराठवाड्यासह राज्यभरात समाजपयोगी उपक्रम राबवून मंजुषा दर्डा यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील मोठे पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. कोरोना महामारीच्या दोन वर्षात गंगाखेड शहरांत एकही दिवस घरात न बसता कोरोना रुग्णांना रुग्णालयात आणि घरपोच जेवण पोहोचवणं, गोरगरिबांना अन्नधान्य वाटप करणं आदी समाजपयोगी उपक्रम थेट राबवत सामाजिक कार्यकर्त्या मंजुषा दर्डा यांनी गंगाखेड शहरवासी यांची मनं जिंकलेली आहेत. त्यांच्यासोबत घडलेल्या या घातपाताच्या संभाव्य प्रकारामुळे गंगाखेड शहरात घटनेचे वृत्त कळताच या घटनेच्या सखोल चौकशीची अपेक्षा नागरिक ठेवून आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :