Palghar : शिवसेना शिंदे गटाच्या आदिवासी समाज राज्य संघटक पदी जगदीश धोडी यांची नियुक्ती
Shiv Sena Shinde : शिवसेना पक्षाच्या आदिवासी समाज राज्य संघटकपदी जगदीश धोडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पालघर: शिवसेना पक्षाच्या आदिवासी समाज राज्य संघटकपदी जगदीश धोडी (Jagdish Dhodi) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या आदेशाने त्यांची नियुक्ती करण्यात आली असून रविवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
जगदीश धोडी हे 2016 पासून शिवसेना पक्षात कार्यरत असून या आधी त्यांनी बोईसर विधानसभा संघटक, पालघर उपजिल्हाप्रमुख अशा पक्षाच्या विविध संघटनात्मक जबाबदार्या सांभाळल्या आहेत. पक्षातील त्यांचे संघटनात्मक काम बघून 2018 साली त्यांची कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली होती. एक वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी पाटबंधारे विभागाच्या कोकणातील अनेक धरण प्रकल्पांचा आढावा घेत रखडलेले प्रकल्प आणि कालव्यांची कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला.
जगदीश धोडी हे आपल्या तरुण वयापासूनच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. सुरवातीला खैरापाडा ग्रामपंचायतीचे सरपंच, त्यानंतर पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परीषद सदस्य असा त्यांचा राजकीय प्रवास राहीला आहे. श्रमजीवी संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष म्हणून देखील त्यांनी जबाबदारी पार पाडली असून 2014 मध्ये त्यांनी भाजप पक्षाकडून बोईसर विधानसभेची निवडणूक लढवली होती. राजकीय क्षेत्रासोबतच सामाजिक क्षेत्रात देखील जगदीश धोडी यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या आधार प्रतिष्ठान या संघटनेमार्फत दरवर्षी आदिवासी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील वधू वरांचा भव्य असा सामुदायिक विवाह सोहळा बोईसर येथे आयोजित केला जातो. या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यामातून आतापर्यंत जवळपास चार हजार गरीब जोडप्यांचा विवाह लावून देण्यात आला आहे.
जगदीश धोडी हे शिवसेना पक्षाच्या संघटनात्मक वाढीसाठी करीत असलेले प्रयत्न आणि पालघर जिल्ह्यात असलेला त्यांचा दांडगा जनसंपर्क याची दखल घेऊन संपूर्ण राज्यातील आदीवासी समाज पक्षासोबत जास्तीत जास्त जोडला जावा यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी टाकत राज्याच्या आदिवासी समाज राज्य संघटक पदी नियुक्ती केल्याने जगदीश धोडी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.