![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Raksha Bandhan 2023: बांबूच्या राख्या झाल्या ग्लोबल! पालघरच्या राख्या जाणार साता समुद्रापार, परदेशात मोठी मागणी
टेटवाली येथे तयार झालेली बांबूपासून राखी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हाताला बांधली जाणार असून त्यानंतर ही राखी जी-20 च्या 20 देशांमध्ये विक्रीसाठी पाठवली जाणार आहे.
![Raksha Bandhan 2023: बांबूच्या राख्या झाल्या ग्लोबल! पालघरच्या राख्या जाणार साता समुद्रापार, परदेशात मोठी मागणी Raksha Bandhan 2023 Palghar bamboo rakhi will be sold across the sea huge demand abroad Raksha Bandhan 2023: बांबूच्या राख्या झाल्या ग्लोबल! पालघरच्या राख्या जाणार साता समुद्रापार, परदेशात मोठी मागणी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/27/93528b333e3c7417c4d4b0a70de76d3c169309871981789_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पालघर: रक्षाबंधनला (Raksha Bandhan 2023) अवघे काही दिवस शिल्लक असून बाजारात निरनिराळ्या प्रकारच्या आकर्षक अशा प्रकारच्या राख्या विक्रीसाठी आल्या आहेत. सध्या भारतीय बाजारपेठांमध्ये चायनीज राख्यांकडे ग्राहक पाठ फिरवत असून भारतीय बनावटीच्या राख्यांना पसंती देत आहेत. त्यातही काही प्रमाणात महाग असल्या तरी पर्यावरणपूरक राख्यांकडे ग्राहकांचा अधिक कल दिसत असून हीच मागणी लक्षात घेऊन मुंबई ठाण्याजवळ असलेल्या पालघर जिल्ह्यातील विक्रमगड येथील महिला बचत गटाने बांबूपासून राख्या तयार केल्या आहेत. या राख्यांना महाराष्ट्रासह देशभरातून चांगली मागणी येत असून या राख्या सध्या 20 देशांमध्ये विक्रीस जाणार आहेत. या राख्यांमुळे विक्रमकडसारख्या दुर्गम भागातील महिलांच्या हाताला घरबसल्या काम मिळाले असून या माध्यमातून येथील महिला आपल्या कुटुंबाची आर्थिक घडी मजबूत करत आहेत.
यावर्षी तब्बल 12 हजार राख्यांची निर्मिती
पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण दुर्गम भागात बेरोजगारीच मोठे प्रमाण असून रोजगारासाठी येथील अनेक कुटुंब मोठ्या शहरांकडे स्थलांतरित होतात. स्थानिक पातळीवर येथील बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध झाल्यास येथील बरेचसे प्रश्न हे मार्गी लागतील हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून केशव सृष्टी या संस्थेने विक्रमगडमधील तेतवालीसह परिसरातील गावांमधील निरक्षर आणि कमी शिक्षण असलेल्या महिलांना बांबू पासून राख्या बनवण्याचं 30 दिवसांच प्रशिक्षण दिले. या भागात बांबू मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असून याच बांबूपासून येथील महिलांना रोजगार उपलब्धतेची संधी केशव सृष्टी आणि नाबार्ड यांनी करून दिली आहे. टेटवाली येथील बांबू हस्तकला महिला बचत गटात गावातील 50 महिला काम करत असून त्यांनी यावर्षी तब्बल 12 हजार राख्यांची निर्मिती केली आहे. सुबक आणि आकर्षक दिसणाऱ्या या राख्यांसाठी बांबू , दोरा , फेविकॉल , कलर , मणी , वॉर्निश इत्यादी साहित्य लागत असून एका राखीसाठी जवळपास 13 ते 15 रुपयांचा खर्च येतो. या राख्या बाजारपेठेत 30 ते 32 रुपयांपर्यंत विकल्या जात असून प्रत्येक राखी मागे या महिला बचत गटाला 15 ते 17 रुपयापर्यंत नफा मिळतोय . तेतवाली येथील या महिला बचत गटांनी 35 ते 40 दिवसात 12 हजार राख्या तयार केल्या असून यातून प्रत्येक महिलेला दहा ते बारा हजार रुपये नफा मिळणार असल्याने या महिलांनी समाधान व्यक्त केले आहे.
विक्रमगड तालुक्यातून चाळीस हजार राख्या परदेशात पाठवणार
टेटवाली महिला बचत गटाप्रमाणेच विक्रमगड मधील दुर्गम भागातील अडीचशेपेक्षा जास्त महिलांनी केशव सृष्टी आणि नाबार्डच्या माध्यमातून राख्या तयार करण्याचं काम हाती घेतलं आहे. एकट्या विक्रमगड तालुक्यातून चाळीस हजार राख्या महाराष्ट्रासह परराज्य आणि परदेशात पाठवल्या जाणार आहेत. रक्षाबंधन प्रमाणेच दिवाळीत आकाश कंदील तर इतर वेळेत बांबूपासून आकर्षक वस्तू तयार केल्या जात असून या वस्तूंना मोठी मागणी पाहायला मिळते. घराशेजारीच रोजगार निर्माण झाल्याने येथील महिलांना आता घर सोडून रोजगारासाठी शहरांकडे जावं लागत नसल्यान मोठा दिलासा मिळाला आहे.
बांबूपासून राखी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हाताला बांधली जाणार
पालघरच्या जव्हार , मोखाडा , विक्रमगड या परिसरात रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने येथील अनेक कुटुंब ही रोजगारासाठी स्थलांतरित होत आह. मागील चार वर्षांपूर्वी केशव सृष्टी आणि नाबार्डने दिलेल्या हस्तकलेच्या प्रशिक्षणानंतर या स्थलांतरात मोठी घट झाली आहे . टेटवालीसह परिसरातील गावांमध्ये मागील काळात 70 ते 80 टक्के कुटुंब ही रोजगारासाठी स्थलांतरित होत होती. मात्र आता हे स्थलांतरच प्रमाण 20 ते 30 टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होत असल्याने स्थानिक नागरिकांकडून समाधान व्यक्त केला जात आहे. टेटवाली येथे तयार झालेली बांबूपासून राखी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हाताला बांधली जाणार असून त्यानंतर ही राखी जी-20 च्या 20 देशांमध्ये विक्रीसाठी पाठवली जाणार असल्याची माहिती येथील माजी सरपंचांनी दिली आहे.
चायना राख्यांना सध्या देशात फारशी पसंती मिळत नसून ग्रामीण भागात तयार होणाऱ्या अशा हस्तकलांच्या राख्यांना ग्राहकांची मोठी मागणी आहे. त्यातही बांबूपासून तयार केलेल्या राख्या या अधिक आकर्षक आणि पर्यावरणपूरक असल्याने या राख्यांच्या मागणीत दरवर्षी मोठी वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. बांबूपासून तयार केला जाणारा या राख्यांमुळे पर्यावरणाचा समतोल ही राखला जात असून दुर्गम भागातील महिलांना अगदी घराशेजारीच रोजगार उपलब्ध होत असला तरी आता शासनाने यात या महिलांना मदत करून त्यांना आणखी सुविधा पुरवल्यास या भागातील अनेक कुटुंबाचे स्थलांतर रोखण्यात नक्कीच मदत होईल यात शंका नाही.
हे ही वाचा :
Raksha Bandhan 2023: भारतातलं असं मंदिर जे फक्त राखी पोर्णिमेला उघडतं, काय आहे या मागील नेमके कारण?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)