Palghar Rain: पालघर जिल्ह्यातील पाणी प्रश्न लवकरच सुटणार, पावसामुळं धरणांमध्ये चांगला पाणीसाठा
Palghar: सततच्या पावसामुळे पालघरमधील धरणांमध्ये चांगला पाणीसाठा झाला असून जिल्ह्यातील शहरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरच सुटणार आहे.
Palghar News: पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस सुरू असून जिल्ह्यातील धरणांच्या पाणी साठ्यामध्ये चांगली वाढ झाली आहे. पालघर (Palghar) जिल्ह्यातील सर्वात जास्त पाणी क्षमता असलेल्या सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणामध्ये तब्बल 50 टक्के पाणीसाठा निर्माण झाला असून या धरणाच्या खाली असलेलं कवडास धरण ओव्हरफ्लो झालं आहे. धरण क्षेत्रामध्ये 1 जूनपासून आतापर्यंत एकूण 1 हजार 739 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
मुख्य धरणांसह पालघर जिल्ह्यातील इतर लहान धरणांमध्ये देखील चांगला पाणीसाठा निर्माण झाला आहे. या धरणांमधून पालघर जिल्ह्यातील प्रमुख शहरं त्याचप्रमाणे पालघर लगत असलेल्या वसई-विरार (Vasai-Virar) महानगरपालिका आणि मीरा-भाईंदर (Mira-Bhayandar) महानगरपालिकेला पाणीपुरवठा होतो. त्यामुळे पालघर जिल्ह्याबरोबरच वसई-विरार महानगरपालिका तसेच मीरा-भाईंदर महानगरपालिकेचा पाणी प्रश्नही लवकरच सुटणार आहे.
दुसरीकडे पावसामुळे पालघरच्या गावपाड्यातील रस्ते बंद
पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होते आणि त्याच्या अभावामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीचे मार्गही बंद होतात, असाच काहीसा प्रकार पालघर (Palghar) जिल्ह्यात घडला आहे. मुसळधार पावसामुळे पालघरमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. बंधारे पाण्याखाली गेले आहेत आणि गावागावांतील रस्तेही बंद झाले आहेत. पालघरच्या विक्रमगडमधील (Vikramgad) दोन महिन्याच्या चिमुकलीचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
रस्ते बंद असल्याने चिमुकलीचा उपचाराअभावी मृत्यू
पावसामुळे नदीचे पाणी वाढल्याने बंधारा पाण्याखाली गेला आहे. पाड्यावरून दवाखान्यात जाणारी वाटच बंद झाली. रस्ता बंद झाल्यामुळे चिमुकलीला वेळेत उपचार मिळू शकले नाही आणि रुग्णालयात पोहोचण्याआधीच तिचा मृत्यू झाला.
विक्रमगडमधील मलवाडा म्हसेपाडा येथील लावण्या नितीन चव्हाण ही चिमुकली दोन दिवसांपूर्वी अचानक तापामुळे आजारी पडली. त्यानंतर श्वसनाचा जास्त त्रास होऊ लागल्याने तिच्या कुटुंबियांनी तिला उपचारासाठी मलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्याचा निर्णय घेतला. पावसाळ्यात म्हसेपाड्याला गारगाई आणि पिंजाळ या दोन नद्यांचे पाणी वेढा घालत असल्याने पाड्याबाहेर पडण्यासाठी येथील ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागते. पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे मलवाडा म्हसेपाड्याला जोडणारा नदीवरील लहान बंधारा पाण्याखाली गेला होता.
पन्नासपेक्षा अधिक कुटुंबांची वस्ती असलेल्या या पाड्याला चारही बाजूंनी नदीच्या पाण्याने वेढा घातला असल्याने या चिमुकलीला घेऊन कुटुंबियांनी आड रस्त्याने प्रवास सुरू केला. हा आड रस्ता लांबून असल्याने रुग्णालयात पोहचण्याआधीच या मुलीचा मृत्यू झाला. या मयत चिमुकलीच्या मृतदेहाचं विक्रमगड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं असून मृत्यूचं कारण अजूनही समोर आलेलं नाही.
हेही वाचा:
Palghar: बावडा गावात बिबट्याची दहशत; गावकरी भीतीच्या सावटाखाली