Palghar Rain : पालघरला मुसळधार पावसाचा तडाखा! भातशेतीसह बागायती शेती आणि घरांचंही नुकसान
Palghar News : पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे भात शेतीसह बागायती शेती, घरं आणि जिल्ह्यातील रस्त्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
Palghar Rain Loss : पालघर जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या मुसळधार आणि ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार माजवला विशेषतः पालघर, डहाणू, जव्हार, विक्रमगड या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भात शेतीसह बागायती शेती, घरं आणि जिल्ह्यातील रस्त्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
पालघर जिल्ह्याला मुसळधार पावसाचा तडाखा
पालघर जिल्ह्यात जवळपास 75 हजार हेक्टरवर भात शेती केली जाते तर, उर्वरित क्षेत्रावर बागायती शेती होते. पालघर जिल्ह्याबरोबरच जव्हार तालुक्यातील वडोली खरोंडा पिंपळशेत या भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि त्यामुळे काही वेळातच नद्यांना आलेल्या पुरामुळे पुराचं पाणी थेट गावामध्ये शिरलं आहे. काही वेळातच आताच रोपणी झालेल्या भात शेतीच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.
शेती, घरांसह रस्त्यांचंही मोठ्या प्रमाणात
दुसरीकडे काही क्षणातच याच पुराचं पाणी घरांमध्ये शिरलं त्यामुळे घरामधील माणसांनी कुटुंबासह आपला जीव वाचवण्यासाठी टेकड्यांवरती पळ काढला या पुराच्या पाण्यामुळे घरातील सामाना बरोबरच जीवनावश्यक वस्तू, महत्त्वाचे कागदपत्र आणि विद्यार्थ्यांच्या दप्तराचही मोठ्या नुकसान झालं असून घरामध्ये चिखलमय वातावरण झालं आहे. सध्या काही कुटुंबांना खाण्यासाठी काही उरलं नाही त्यामुळे ही पूरग्रस्त कुटुंब मेटाकुटीला कुठे आले आहेत तर दोन दिवस उलटूनही कोणतीही शासकीय यंत्रणा इथे पोहोचलेली नाही.
भात शेती आणि बागायतदारांचं नुकसान
दरम्यान, भात शेती बरोबरच बागायती शेतीचही अतोनात नुकसान झालं आहे. लाखो रुपये खर्च आणि कष्ट करून जोपासलेली बागायती शेतीचं काही वेळातच होत्याच नव्हतं झालं. वडोलीमधील केळी, पपई बागायतदारांना नुकसानीला सामोरं जावं लागत आहे. एकूणच पाहायला गेलं तर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने भात शेती ,बागायती शेती बरोबरच घर आणि रस्त्यांचही मोठ नुकसान झालं असून मायबाप सरकार या नुकसानी कडे लक्ष देऊन मदत करतील का अशी याचना आत्ता पालघर मधील शेतकरी आणि नुकसानग्रस्त नागरिकांकडून करण्यात येतं आहे.
धामणी धरणाचे पाचही दरवाजे पुन्हा बंद
पालघर जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाचे पाचही दरवाजे पुन्हा बंद करण्यात आले असून सूर्या नदीत होणारा पाण्याचा विसर्ग बंद झाला आहे. मात्र कवडास धरणातून 7179 क्यूसेक पाण्याचा विसर्ग अजूनही सुरू आहे. धरण क्षेत्रात आज 108 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून आत्तापर्यंत एकूण 3015 पाऊस नोंदवण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस होता यामुळे सूर्या नदीला पूर आला होता. या पुरामुळे सकल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं.