Palghar : रक्षाबंधन करून निघालेल्या कुटुंबावर काळाची झडप, दोन ठार, मृतांमध्ये 10 वर्षांचा मुलगा
Palghar Mahim Road Accident : ओव्हरटेक करताना समोर आलेल्या कारला धडकल्याने दुचाकीस्वार आणि गाडीवरील 10 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला.
पालघर : पालघर-माहीम रस्त्यावर मंगलम रिसॉर्ट येथे एका वाहनाला ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनाला ठोकर दिल्याने अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार दिनेश पाटील आणि 10 वर्षीय दक्ष गावड हे दोघे ठार झाले तर अन्य दोन जखमी झाले. रक्षाबंधनाच्या निमित्ताने निघालेल्या या कुटुंबावर काळाने झडप घातली.
नालासोपारा येथे रूपेश गावड हे आपली पत्नी हृषाली गावड, दोन मुले श्रावणी गावड (15) आणि दक्ष गावड (10) यांच्यासोबत राहतो. रविवारी पत्नी हृषाली ही दोन मुलांसह रक्षाबंधनानिमित्ताने भावाला राखी बांधण्यासाठी सफाळेवरून कोरे येथे गेली. भावाला राखी बांधून झाल्यावर ती बहिणीच्या पतीच्या दुचाकीवर बसून पालघरकडे येत होती. माहीमजवळील मंगलम हॉटेलजवळ एका वाहनाला ओव्हरटेक करताना दुचाकीस्वार समोर येणाऱ्या कारला धडकला.
ही धडक इतकी भयानक होती की चारचाकी वाहनाची एअर बॅग ओपन झाली. या अपघातात दक्ष गावड याचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकी चालवणारा मथाने येथील दिनेश पाटील याचाही खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला. या अपघातात जखमी झालेली आई आणि मुलगी हे खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. या प्रकरणात सातपाटी सागरी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक योगेश जाधव हे करीत आहे.
ही बातमी वाचा: