Palghar Accident : टेम्पो-बाईकची समोरासमोर धडक, सुट्टीच्या दिवशी घरी जाणाऱ्या दोघांवर काळाचा घाला
Palghar Accident : समोरासमोर झालेल्या धडकेत बाईकवर असलेल्या दोन्ही तरुणांचा मृत्यू झाला आहे. ते दोघेही सुट्टीनिमित्त थरोंडा या मूळ गावी जात असताना ही दुर्दैवी घटना घडली.
पालघर : जव्हार पाली रस्त्यावर वाकडू पाडा येथे पिकअप टेम्पो आणि बाईकचा भीषण अपघात झाला असून त्यामध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. संदेश लहानू पागी (वय 25) आणि विजय भंडारी (वय 24) अशी मृतांची नाव असून ते जव्हार तालुक्यातील थरोंडा या गावाचे रहिवासी होते. विक्रमगड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पिकअप चालकाला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू केला आहे.
जव्हार पाली रस्त्यावरील वाकडू पाडा गावाजवळ हा भीषण अपघात घडला आहे. पिकअप टेम्पो आणि बाईक मध्ये समोरासमोर टक्कर झाल्याने या दोन्ही तरुणांचा मृत्यू झाला.
वाड्यातील खासगी कंपनीत काम करणारे जव्हार येथील दोन तरुण शनिवार आणि रविवारी सुट्टी असल्याने त्यांच्या मूळ गावी बाईकने जात होते. दरम्यान बाईक वरील ताबा सुटल्याने ती समोरुन येणाऱ्या पिकअप टेम्पोला धडकली आणि त्यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला.
दुचाकीवरून खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून बस गेली
काही दिवसांपूर्वी वर्धात एक धक्कादायक अपघात घडला होता. आर्वी येथील सावळापूर गावात दोन दुचाकीचा अपघात झाला. या अपघातादरम्यान दुचाकीवरून खाली पडलेल्या एका युवकाच्या अंगावरून बस गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या दुसऱ्या जखमी तरुणाचा रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना घडली.
सावळापूर येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यामध्ये एक दुचाकीस्वार खाली पडला. दरम्यान मागून येणाऱ्या बसचे चाक त्याच्या अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना प्रत्यक्ष डोळ्याने पाहणाऱ्या अपघातातील दुसऱ्या दुचाकीवरील जखमी दुचाकीस्वार रुग्णालयात दाखल झाला. पण घटना पाहूनच या दुचाकीस्वाराला धक्का बसल्याने त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे.
ही बातमी वाचा: