Cyrus Mistry : सायरस मिस्त्री अपघात प्रकरणी पोलिसांकडून 150 पानांचं आरोपपत्र, अनाहिता पंडोलवर गंभीर आरोप
Cyrus Mistry Accident Case : उद्योगपती आणि टाटा समूहाचे माजी संचालक सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन झालं होतं. या प्रकरणी पालघर पोलिसांकडून दीडशे पानांचं आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आलं आहे.
Cyrus Mistry Accident : प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूनंतर पालघर पोलिसांकडून (Palghar Police) दीडशे पानांचं आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आलं आहे. उद्योगपती आणि टाटा समूहाचे माजी संचालक सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन झालं होतं. मुंबई- अहमदाबाद महामार्गावर 4 सप्टेंबर 2022 रोजी मिस्त्री यांच्या कारला अपघात झाला होता. त्यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या अनाहिता पंडोल (anahita pandole) या गंभीर जखमी झाल्या होत्या. तसंच बेदरकारपणे आणि अतिवेगात कार चालवल्याप्रकरणी अनाहिता पंडोल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनाहिता पंडोल यांच्याबाबत पोलिसांनी आणखी एक दावा केला आहे. गाडी चालवताना अनाहिता पंडोले यांनी सीटबेल्ट चुकीच्या पद्धतीने लावला असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. पालघरचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटिल यांनी याबाबत माहिती दिली आहे. अनाहिता यांच्या या चुकीमुळंच त्यांना गंभीर जखम झाली आहे.
पालघरमधील सूर्या नदीच्या पुलाच्या कठड्याला धडकून झालेल्या अपघातात सायरस मिस्त्री यांच्यासह जहागिर पंडोल यांचाही मृत्यू झाला होता. ते अहमदाबादहून मुंबईकडे परतत होते. या अपघातात अनाहिता आणि त्यांचे पती डेरियस हेदेखील गंभीर जखमी झाले होते. अनाहिताच त्यावेळी कार चालवत होत्या.
अनाहिता यांनी लॅप बेल्डचा वापर अलार्म बंद करण्यासाठी केला
कार चालवत असताना अनाहिता यांनी सीट बेल्ट चुकीच्या पद्धतीने लावला होता. त्यांनी फक्त शोल्डर हार्नेस लावला होता. तर, लॅप बेल्ट अडजस्ट केलाच नव्हता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मर्सिडिज बेंझ किंवा कोणत्याही इलेक्ट्रक कारमध्ये एक अलार्म सेट केलेला असतो. ज्यावेळेस सीट बेल्ट योग्य पद्धतीने वापरला नसेल तेव्हा तो अलार्म वाजतो. या अलार्मपासून वाचण्यासाठी अनाहिता यांनी लॅप बेल्डचा वापर अलार्म बंद करण्यासाठी केला. अनाहिता यांनी तो बेल्ट अलार्मला लावला आणि फक्त शोल्डर हार्नेस लावला होता, असं समोर आलं आहे.
अनाहिता यांचा हा निष्काळजीपणाही आरोपपत्रात नमूद करण्यात येणार आहे, असं पोलिसांनी म्हटलं आहे. तसंच, पोलिस अनाहिता या रुग्णालयात दाखल असून त्यांना डिस्चार्ज मिळताच पोलिस त्यांचा जबाब नोंदवणार आहेत. तेव्हा कोर्टात वेगळं आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे.
अपघातानंतर अनाहिता या जबर जखमी झाल्या होत्या. मुंबईतील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. येत्या काही दिवसांत त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अनाहिता पंडोल यांनी कित्येकदा बेदरकारपणे कार चालवत वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचंही समोर आलं आहे. अतिवेगात कार चालवल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात 2002 ते 2022 पर्यंत सात वेळा चलन फाडण्यात आले आहे. विशेष म्हणजे ही चालान त्याच मर्सिडीज बेंझ कारला जारी करण्यात आली होती, ज्या कारमध्ये सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू झाला होता.
अनाहिता यांच्यावर गुन्हा दाखल
अनाहिता पंडोल यांच्या विरोधात कासा पोलीस ठाणे येथे भा.द.वि.स.कलम 304(अ), 279, 337, 338, सह मोटार वाहन कायदा कलम 112/ 183, 184, मोटार वाहन चालक नियम 14, 05, 06/177(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेदरकारपणे आणि अतिवेगात कार चालवल्याप्रकरणी, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.