नालासोपाऱ्यात 27 वर्षीय बॉडी बिल्डरचा दुर्दैवी मृत्यू, हार्ट अटॅकने अजिंक्य कदमने घेतला अखेरचा श्वास
Nalasopara News : नालासोपाऱ्यात 27 वर्षाच्या बॉडी बिल्डरचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
नालासोपारा : नालासोपाऱ्यात 27 वर्षाच्या बॉडी बिल्डरचा हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अजिंक्य कदम असे 27 वर्षीय बॉडी बिल्डर तरुणाचे नाव असून, तो नालासोपारा (Nalasopara) पूर्व मोरे गाव आरंभ कॉलनीमध्ये राहत होता. सोमवारी (04 सप्टेंबर) सकाळी अचानक त्याला अस्वस्थ वाटत असल्याने त्याला जवळच्या महापालिकेच्या रुग्णालयात (Municipal Hospital) दाखल केले असता. तिथल्या डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
अविवाहित असलेल्या अजिंक्यने 75 kg वजनात आपल्या बॉडी बिल्डिंगच्या माध्यमातून, पालघर जिल्ह्यात विविध पारितोषिक मिळवली होती. त्याच्या पश्चात आई, वडील, तीन भाऊ आणि एक बहीण असून मुलांमध्ये घरात तो मोठा होता. अचानक त्याच्या जाण्याने कदम कुटुंबासह मित्रपरिवारवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल केलं पण...
अजिंक्य कदमला काल म्हणजेच 4 सप्टेंबर रोजी सकाळी अचानक अस्वस्थ वाटायला लागलं होतं. छातीत दुखत असल्याचं त्याने कुटुंबियांना सांगितलं. त्यानंतर कुटुंबियांनी त्याला महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र काही तासातच त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित घेतलं. घरातील मोठा मुलगा अचानकपणे कायमचा निघून गेल्याने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
माजी मिस्टर इंडिया प्रेमराज अरोरा वॉशरुममध्ये मृतावस्थेत सापडला
दरम्यान तीन महिन्यांपूर्वी देशातील प्रसिद्ध बॉडीबिल्डर आणि माजी मिस्टर इंडिया प्रेमराज अरोरा याचं निधन झालं होतं. प्रेमराज याचं वय अवघं 42 वर्षे होतं. त्याच्या मृत्यूचं कारणही हृदयविकाराचा झटका असल्याचं सांगितलं जात आहे. प्रेमराजचा मृतदेह 25 मे रोजी वॉशरुममध्ये आढळला होता. वर्कआऊट करुन तो वॉशरुममध्ये गेला मात्र काही तास उलटूनही तो बाहेर आला नाही. तेव्हा दरवाजा ठोठावला, मात्र त्याने उत्तर दिलं नाही. रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
तरुणांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलं
दरम्यान अजिंक्य कदम याच्या मृत्यूमुळे आणखी एक बाब समोर आली आहे ती म्हणजे तरुणांमध्ये वाढतं हार्ट अटॅकचं प्रमाण. वय जास्त असलेल्या नागरिकांना हार्ट अटॅक येतात, हा समज आता मागे पडला आहे. पूर्वी हार्ट अटॅक येण्याचे वय हे साधारण 60 वर्षांच्या पुढे होतं पण आता ते वय 20 ते 30 वर्षांपर्यंत आलं आहे. तरुणाईमध्ये हृदयविकाराच्या झटक्यांचे प्रमाण वाढत आहेत. ताणतणाव वाढल्याने तरुणाईमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे हृदयरोग बळावू नये यासाठी आपली जीवनशैली चांगली असणं गरजेचं असतं. यासाठी आहार, झोप, व्यायाम या किमान गोष्टींकडे आपण वेळीच लक्ष द्यायला हवं.
हेही वाचा