आपलं घर : राष्ट्र सेवा दलाच्या अनाथालयाच्या अनुदानासाठी लाचेची मागणी, महिला बाल कल्याणच्या अधिकाऱ्याचा प्रताप
राष्ट्र सेवा दलाचे नेते पन्नालाल सुराणा (Pannalal Surana) यांना महिला आणि बाल कल्याण विभागातील अधिकाऱ्यांनी (Department of women and child development) लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे.
Pannalal Surana : ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि राष्ट्र सेवा दलाचे नेते पन्नालाल सुराणा (Pannalal Surana) यांना महिला आणि बाल कल्याण विभागातील अधिकाऱ्यांनी (Department of women and child development) लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. पन्नालाल सुराणा यांनी लाच दिली नाही म्हणून त्यांच्या 'आपलं घर' या अनाथालयाला अनुदान दिले नसल्याची माहिती खुद्द सुराणा यांनी दिली आहे. सुराणा यांनी टेबलाखालून पैसे देण्यास नकार दिल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी आता काळ बदलला आहे, तुम्हीही बदला, असा सल्लाही दिला असल्याचे सुराणा यांनी सांगितले.
आणीबाणीत जेल भोगलेल्या समाजवादी नेते पन्नालाला सुराणा यांना महिला आणि बाल कल्याण विभागातील अधिकाऱ्यांनी लाचेची मागणी केल्याचा प्रकार समोर आलं आहे. त्यांच्या आपलं घर या अनाथालयाला अनुदान देण्यासाठी या लालेची मागणी केल्याचा आरोप एबीपी माझाशी बोलताना सुराणा यांनी केला आहे.
पन्नालाल सुराणा नेमकं काय म्हणाले ते पाहुयात
कोणत्याही सरकारी कामासाठी पैसा द्यायचा नाही हे आम्ही पहिल्यापासूनच ठरवलं असल्याचे पन्नालाल सुराणा यांनी एबीपी माझाला सांगितले. आपलं घर या अनाथालयाला महिला आणि बाल विकासकडून अनुदान मिळते. त्याची खूप किचकट प्रक्रिया आहे. जेवढी रक्कम मिळणार आहे त्याबाबतची माहिती जिल्हा महिला बालविकास कार्यालयाकडून पाठवली जाते. मात्र, हे अनुदानाचे पैसे मिळवण्यासाठी मला एकदा पैशाची मागणी झाल्याचे सुराणा यांनी सांगितले. गेल्या चार दिवसापूर्वीच ही पैशांची मागणी झाल्याचं सुराणा यांनी सांगितले. एका ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकाला अशा प्रकारची लाच मागितल्याची दखल महिला आणि बाल विकास मंत्री घेणार का? या प्रकरणाची चौकशी करुन लाच मागणाऱ्यांवर कारवाई करणार का? हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.
आपलं घर या अनाथालयाला अनुदान मिळवण्यासाठी गेल्या चार महिन्यापासून पन्नालाल सुराणा आणि त्यांचे सहकारी अनेक हेलपाटे महिला आणि बाल कल्याण विभागात मारत आहेत. परंतू अधिकाऱ्यांना हवे असलेले काही मिळत नसल्यानं सुराणा यांच्या संस्थेला अनुदान मिळाले नाही. पैसे देण्यास पन्नालाल सुराणा यांनी नकार दिल्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी आता काळ बदलला आहे तुम्ही बदला असा सल्ला दिल्याची माहिती सुराणा यांनी दिली. मात्र, या घटनेनंतर महिला आणि बाल कल्याण विभागाच्या अधिकाऱ्याचा प्रताप समोर आला आहे.
25 लाख 12 हजार रुपयांचे अनुदान मिळालेच नाही
30 ऑक्टोबर 1993 रोजी लातूर आणि उस्मानाबादमध्ये भूकंप झाला होता. यात हजारो लोकांनी आपले जीव गमावले. अनेक मुले अनाथ झाली होती. अशा अनाथ मुलांसाठी पन्नालाल सुराणा यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये राष्ट्रसेवा दल संचलित 'आपलं घर' हे बालगृह सुरू केले. पहिल्या वर्षी त्यांच्याकडे 250 ते 300 मुले होती. सुराणा यांचे काम पाहून तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी त्यांच्या संस्थेला पाच एकर जागा दिली होती. सध्या या संस्थेत पहिली ते दहावीतील सुमारे 125 हून अधिक मुले वास्तव्यास आहेत. त्यानंतर 2000 सालापासून या संस्थेला शासकीय अनुदान मिळू लागले. पण 2013-14, 14-15 या वर्षांचे 25 लाख 12 हजार रुपयांचे अनुदान मिळालेच नाही. त्यासाठी सुराणा यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 2020 मध्ये न्यायालयाने महिला व बालविकास आयुक्तालयाला हे प्रकरण लवकर मार्गी लावण्याचा आदेश दिला. रखडलेले अनुदान मिळवण्यासाठी चार महिन्यांपूर्वी सुराणा आणि त्यांचे सहकारी पुण्यात आले होते. महिला व बालविकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर त्यांनी संस्थेला लवकरच अनुदान देण्याचे आश्वासन दिले. परंतु, त्यानंतर 'एका किराणा बिलात घोळ झाला आहे', 'ट्रस्टचे आधार कार्ड नाही', अशा एक ना अनेक त्रुटी काढत अनुदान देण्यास अधिकाऱ्यांनी टाळटाळ सुरु केली.
महत्त्वाच्या बातम्या: