Vashi Fire news: बिछान्याला खिळलेल्या आजीबाईंना उठताच आलं नाही, खोलीतील धुराने श्वास गुदमरला अन्... वाशीतील अग्नितांडवात चौघांचा मृत्यू
Navi Mumbai fire news: नवी मुंबईत सोमवारी रात्री दोन ठिकाणी भीषण आग लागली. कामोठ्यातील आगीत मायलेकीचा मृत्यू झाला. तर वाशीतील आगीच्या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू.

Vashi Fire news: राज्यभरात दिवाळी उत्साहात साजरी होत असताना नवी मुंबईकरांसाठी मंगळवारची सकाळ दोन अत्यंत वाईट बातम्या घेऊन उजाडली. नवी मुंबईतील कामोठे आणि वाशी परिसरात लागलेल्या भीषण आगीत (Navi Mumbai Fire) सहा जणांचा मृत्यू झाला. यापैकी वाशी येथील रहेजा रेसिडन्सी या इमारतीला लागलेल्या आगीमध्ये चार जणांचा मृत्यू झाला. वेदिका सुंदर बालकृष्णन (वय 6), कमला हिरल जैन (वय 84), सुंदर बालकृष्णन (वय 44) आणि पूजा राजन (वय 39) अशी मृतांची नावे आहेत. या दुर्घटनेत सुंदर बालकृष्णन, पूजा राजन आणि त्यांची सहा वर्षांची मुलगी वेदिका यांचा होरपळून मृत्यू झाला. ऐन दिवाळसणात या कुटुंबाचा दुर्दैवी अंत झाल्याने वाशी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Navi Mumbai News)
याशिवाय, रहेजा रेसिडन्सीला लागलेल्या आगीमध्ये आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. 84 वर्षांच्या कमला हिरल जैन यांना आगीत आपला जीव गमवावा लागला. कमला जैन या आजारी असल्यामुळे बिछान्यालाच खिळून होत्या. त्यामुळे आग लागल्यानंतर त्यांच्या घरातील इतर सदस्य बाहेर पडले. मात्र, कमल जैन यांना उठून बाहेर जाता आले नाही. अग्निशमन दल याठिकाणी आल्यानंतर त्यांनी बचावकार्याला सुरुवात केली. अग्निशमन दलाचे जवान इमारतीच्या आत दाखल होऊन दहाव्या मजल्यापर्यंत पोहोचले होते. मात्र, याठिकाणी प्रचंड धूर पसरल्याने कमला जैन यांना लगेच बाहेर काढता आले नाही. त्यामुळे कमला जैन यांचा आगीत होरपळून आणि धुराने गुदमरुन जागेवरच मृ्त्यू झाला.
Navi Mumbai news: वाशीत नेमकं काय घडलं?
काल मध्यरात्री 12.40 च्या सुमारास रहेजा रेसिडेन्सीमध्ये दहाव्या मजल्यावर ही आग लागली. त्यानंतर ही आग वेगाने पसरत गेली आणि 11व्या आणि 12 व्या मजल्याला आगीने कवेत घेतले. या आगीने भीषण स्वरुप धारण केल्याने वाशी, नेरुळ, ऐरोली आणि कोपरखैरणे येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाचे तब्बल 40 जवान ही आग विझविण्यासाठी आणि बचावकार्यात सहभागी झाले होते. या दुर्घटनेत जवळपास 14 जण जखमीही झाले. या सर्वांना हिरानंदानी आणि एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
आणखी वाचा
ऐन दिवाळीत कामोठ्यात आक्रित घडलं, सिलेंडर्सच्या भीषण स्फोटाने आग लागली, माय-लेकीचा होरपळून मृत्यू


















